पालघर :  पाणजू बेटानजीक समुद्रात बेकायदेशीररित्या जाणाऱ्या 6 बोटींचा पाठलाग करून दोन बोटी ताब्यात घेत त्यातील 14 बांगलादेशी संशयितांना कोस्टगार्डने पकडले आहे.  कोस्टगार्ड कॅप्टन विजय कुमार व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. 4 बोटी व अन्य लोक पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळाली नाहीत. तसेच त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशीय वाटत असल्याने कोस्टगार्डने त्यांना पकडून वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

देशाला समुद्री मार्गाने येणाऱ्या संशयितांचा मोठा धोका आहे. डहाणू येथे कोस्टगार्डने उभारण्यात आलेल्या हावरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचे काम  केले जात आहे. कोस्टगार्ड, पोलीस, कस्टम आदी विभागांतर्गत शनिवारी कॅप्टन एम विजयकुमार, कमांडर आर श्रीवास्तव यांची टीम 'सजग' कोस्टल सिक्युरिटी एक्सरसाईज मोहिमेअंतर्गत 'एच 194'  हावरक्राफ्ट बोटीद्वारे समुद्रात तपासणी मोहिम राबवित होते.

त्यावेळी सकाळी 11.30 वाजता पाणजू बेटानजीक 6 बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. कॅप्टन विजयकुमार ह्यांनी आपल्या हावरक्राफ्टने त्या बोटीचा पाठलाग करायला सुरुवात केली. पाठलाग करुन यातील 2 बोटी कोस्टगार्डने ताब्यात घेतल्या. मात्र अन्य 4 बोटी खाडीच्या बाजूला असलेल्या किनाऱ्यावर लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात गायब झाले.

पकडलेल्या लोकांकडे बोटीची कागदपत्रे मागितली असता बोटीला कुठलाही नंबर, कलरकोड, बोटीची नोंद, ओळखपत्रे आदी कुठलीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे सर्व 14 लोक बांगलादेशी आणि बंगाली भाषेत बोलत असल्याचे निदर्शनास येताच संशय बळावल्याने कोस्टगार्डने त्यांना ताब्यात घेतले.

या बोटींच्या मालकाचे नाव मायकल आहे. आबिल शेख (25), शफीकुल (27),आहाजित (33), मोईद्दीन (45), इस्लाम (35), बी.शेख (22), शैफुल (27), एन मुल्ला (45), रफीगुल (19), शहीफुल (27), जे मुल्ला (40), मोंडल (28), पायनल (38), इब्राहिम शेख (25) आदी 14 जणांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले. या 14 जणांना ताब्यात घेत नंतर वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या बोटींच्या मालकाचा शोध  पोलीस घेत आहेत.