जळगाव : स्वतःचे तीन वर्षांच्या बाळाला घरी ठेवत दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्यसेविका हेमलता पाटील यांना 'फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार' जाहीर झाला आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील खेडी खुर्द आरोग्य केंद्रात सद्या त्या कार्यरत आहेत. प्रेमलता पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


आरोग्य क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या आरोग्यसेविकांसाठी देश पातळीवर मानाचा मानला जात असलेला 'फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार' दिला जातो. राष्ट्रपती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होत असते. देश पातळीवर चांगलं काम करणाऱ्या परिचारिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जात असते. यंदा हा पुरस्कार प्रेमलता पाटील यांना जाहीर झाला आहे.


हेमलता या 2006 मध्ये आरोग्य विभागात आरोग्य सेविका म्हणून रुजू झाल्या. त्यावेळी त्यांना तीन वर्षाच बाळ होतं. या बाळाला घेऊन दुर्गम आदिवासी पाड्यावर जाऊन आरोग्य सेवा बजावत असताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र त्यांनी आपल्या बाळाला आपल्या सासरी ठेऊन आदिवासी पाड्यांवर सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी कोणतेही वाहन जात नाही अशा दुर्गम पाड्यावर जाऊन त्यांनी आपली आरोग्य सेवा बजावल. सेवा बाजवत असताना आदिवासी भाषा त्यांना येत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून सर्व सामान्य माणसांसाठी कठीण वाटत असलेली आदिवासी भाषा त्यांनी आत्मसात केली आणि आपली आरोग्य सेवा या ठिकाणी बजावली.


प्रेमलता पाटील यांनी आदिवासी पाड्यावर अनेक रुग्णांना रात्री बेरात्री दिलेल्या सेवेमुळे त्यांचे प्राण वाचले. याशिवाय आदिवासी पाड्यांवर असलेल्या अनेक कुपोषित बालकांना त्यांनी दिलेल्या सेवेमुळे जीवन मिळालं आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचणे अशक्य अशा दुर्गम भागात प्रेमलता पाटील यांनी केवळ आपली सेवाच बजावली असे नाही तर आदिवासी समाजातील लोकांचा विश्वास देखील त्यांनी मिळवला.


आपण 15 वर्षे प्रामाणिकपणे आणि आपुलकीने रुग्णसेवा केली, त्याचं हे फळ मिळालं असल्याची भावना प्रेमलता पाटील यांनी व्यक्त केली. पुरस्कार वितरणाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी पुरस्कार जाहीर झाल्याच्या वृत्ताने आपल्याला खूप आनंद झाला आहे, तो आपण शब्दात व्यक्त करू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्या आरोग्य सेविकेच्या कार्यात आपल्या वरिष्ठ, कर्मचारी एवढंच काय तर रुग्णांनी देखील सहकार्य केले असल्याची विनम्र भावना त्यांनी व्यक्त केली.