मनमाड: सध्या चॉकलेट घेण्यासाठीदेखील कुणी सुट्टे आठाणे वापरत नाही. मात्र नाशिकच्या सचिन खैरेंना एका कंपनीनं चक्क 32 पैशांचा चेक पाठवला आहे. त्यामुळे संबंधित तरुणाला चांगलाच मन: स्ताप सहन करावा लागत आहे.


नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीतील सचिन खैरनार यांना व्होडाफोन कंपनीनं 32 पैशांचा चेक पाठवला आहे. वास्तविक सचिन यांनी नंबर पोर्ट करण्याआधी बिलाचे 32 पैसे अधिक भरले होते. पण नंबर पोर्ट झाल्यानंतर व्होडाफोन कंपनीने त्याचे 32 पैसे कुरिअर करुन चेकने घरी पाठवले. मात्र ते घरी नसल्यानं कुरिअर परत मालेगावला पाठवण्यात आलं. यानंतर कुरिअर कंपनीने फोनवरुन चेक घेऊन जाण्यास सचिन खैरनार यांना सांगितले.

कुरिअरकडून सचिन यांनी चेक मिळवून पाहिला, तर त्यांना  त्यात अॅक्सिस बँकेचा चक्क 32 पैसांचा चेक मिळाला. या 32 पैशांसाठी सचिनला 200 रुपयाचे पेट्रोल खर्च करुन 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याने चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला.

हा चेक वटवायला बँकेत भरला, तर बँकेला प्रोसेसिंग फी वेगळी द्यावी लागते. त्यामुळं सचिन खैरनार यांनी हा चेक सांभाळून ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे.