मुंबई : महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये राज्य शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. तोक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंज्य अर्थिक मदत जाहीर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली. मच्छिमारांची राज्य सरकारने फसवणूक केली आहे अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
नुकसानाची आकडेवारी काय सांगते?
तोक्ते चक्रीवादळात 7 मच्छिमार मृत्यु/बेपत्ता आहेत, 156 मासेमारी नौका पूर्ण जाळ्या आणि मासेमारी साधनसामग्रीसह नष्ट झाल्या आहेत. तर 1027 नौकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. 5 ते 40 लाखांपर्यंतच्या मासेमारी नौका असणाऱ्या मासेमारांना 25 हजारांची मदत आणि दुरुस्तीकरता 10 हजार रुपये, जाळ्यांच्या नुकसानासाठी सरसकट 5 हजार रुपये अशी मदत जाहीर केली आहे. ही मदत म्हणजे मच्छिमारांच्या जखमेवर चोळलेलं मीठच आहे असं महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीकडून सांगण्यात आलं आहे.
शासनाची ही मदत म्हणजे कोळी समाजाचा घोर अपमानच आहे, अशीच भावना सध्या व्यक्त केली जात आहे. चक्रीवादळाचा फटका फक्त समुद्रातील बोटींनाच झाला तर, असं नाही. वादळी पावसामुळे खळ्यांवर साठवून ठेवलेली सुकी मासळी, सुकविण्यास घातलेली मासळी वाहून गेली, तसेच मासळी विक्रेता महिलांनी ताजी घेतलेली मासळीही वाया गेली याचा उल्लेख, पंचनामेही करण्यात आलेले नाहीत असं सांगत कृती समितीनं या नुकसानाचा आकडाही तब्बल 500 कोटींच्या घरात असल्याची माहिती दिली आहे.
सदर परिस्थितीसंदर्भातील सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्यासह इतरही मंत्र्यांपर्यंत पाठवण्यात आली असून, समस्त कोळी समाज आता आपल्या न्यायासाठी लढत आहे.
कोळ्यांची गलबतं माघारी; पुढील 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद
राज्य आणि केंद्र शासनाने तुटपुंजी मदत देऊ नये
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती व राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे बाबा आदम खान यांच्या काळाती कायदे लागू करून तोक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंजी अर्थिक मदत राज्य- केंद्र सरकार ने देऊ नये, असा सूर कृती समितीकडून आळवण्यात आला आहे. याआधी फयान वादळग्रस्त मच्छिमारांना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी 100 कोटी रुपयांची मदत देऊन मासेमारी नौका पूर्ण निकामी (Total Loss) झाल्या होत्या, त्यांना नौका, जाळ्यांचे पुनर्वसन केले होते. तसेच मासे विक्रेत्या, मासे सुकविणारी मंडळी यांनाही अर्थिक मदत केली होती. याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या वतीने मासेमार बांधवांसाठी 250 कोटींची अर्थिक जाहीर करावी शिवाय केंद्राकडून मदत मिळण्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा असतानाच मच्छिमारांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे असा सूर मासेमार वर्गातून आळवण्यात येत आहे.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण
1998 मध्ये वादळात मुंबईत मढ कोळीवाड्यात 3 आणि वेसावा कोळीवाड्यात 2 नौका पूर्ण नष्ट झाल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या प्रयत्नांतून आर्खित मदत देत नुकसानग्रस्त भागात पुनर्वसनही करण्यात आलं होतं. दरम्यान, मुंबईत 50 हून अधिक मासेमारी नौका नष्ट झाल्या असल्या तरी, शिवसेनेचा एकही नेता अथवा मंत्री फिरकला नाही अशी खंत कोळी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
...तर १५ जून २०२१ रोजी राज्यभर अंदोलनाची हाक
तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांच्या मासेमारी नौकांच्या पुनर्वसन करण्यासाठी खालील प्रमाणे अर्थिक मदत राज्य सरकारने करावी.
१) बिगर यांत्रिक, एक दोन व तीन सिलेंडर नौकांना रूपये 3,००,०००
२) चार सिलेंडर नौकांना रूपये 5,०००००
३) सहा सिलेंडर नौकांना रूपये 1०,०००००
४) मृत्यू/बेपत्ता मच्छिमारांच्या नातेवाईकांना रूपये 10 लाख अर्थिक मदत करावी.
५) मासळी सुकविणारे, मासळी विक्रेता महिलांना रूपये 10 हजार रुपयांची अर्थिक मदत मिळावी.
गुजरातप्रमाणे केंद्र सरकारने अर्थिक मदत महाराष्ट्रालाही करावी अशी मागणी करत राज्य- केंद्र सरकारने येत्या आठवडाभरात भूमिका स्पष्ट करावी यासाठी मच्छिमार आग्रही आहेत. असं न झाल्यास 15 जून रोजी राज्यभर महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.