नवी दिल्ली : भारतीय बनावटीचं स्वदेशी विमान साकारण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॅप्टन अमोल यादव यांना आज एक अनोखी कौतुकाची थाप मिळाली. देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज त्यांना भेटीसाठी बोलावलं आणि त्यांच्या या उपक्रमाची माहिती घेतली.


राष्ट्रपती जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल यादव यांच्या या उपक्रमाची माहिती दिली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज अमोल यादव यांच्या पत्नी, आई-वडील, भाऊ यांनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी कॅप्टन अमोल यादव यांच्या धडपडीचं कौतुक तर केलंच, पण विमान पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा आई-वडिलांना त्याची सफर घडव असा प्रेमळ सल्लाही राष्ट्रपतींनी दिला. शेजारीच अमोल यादव यांच्या पत्नी योगिताही उपस्थित होत्या, त्यावर त्यांच्याकडे बघून सॉरी, मी तुमचा पत्ता कट केलाय असं म्हणत राष्ट्रपतींनी मिश्कील विनोद केला.

राष्ट्रपतींच्या अशा निरागस विनोदाने भेटीतला तणावही विरला आणि सगळे हास्यकल्लोळात बुडाले. दरम्यान महाराष्ट्रात लवकरच जी मॅग्नेटिक महाराष्ट्र औद्योगिक परिषद होणार आहे, त्यात या विमानासंदर्भातले काही महत्वाचे सामंजस्य करार होणार असल्याचं कॅप्टन अमोल यादव यांनी सांगितलं. या विमानासाठी कारखान्याच्या जागेचं कामही अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष विमान उड्डाणाचं स्वप्न साकार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.