Horse Market :

  सलग दोन वर्षे कोरोना (Corona) संकटामुळे बंद पडलेल्या घोडेबाजाराची (Horse Market) सुरुवात अकलूज येथून सुरु झाली असून, अश्वांचे अनोखे नखरे आणि ऐट पुन्हा अकलूजच्या घोडेबाजारात पाहायला मिळत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे घोड्यांची खरेदी विक्रीच न झाल्याने अडचणीत आलेल्या घोडे व्यापाऱ्यांनाही या पहिल्या बाजारामुळे दिलासा मिळाला असून आत्तापर्यंत 380 घोड्यांची विक्री या बाजारात झाली आहे. घोडेबाजार हे पहिल्यापासून सर्वांचेच आकर्षणाचे केंद्र राहिल्याने घोडेबाजारात तर गर्दी असतेच पण घोडे शौकीन आणि खरेदीदारांसाठी देखील हि पर्वणी असते. दोन वर्षे बंद राहिल्याने यंदा घोडेबाजार भरणार का? या बाबत व्यापाऱ्यांच्या मनात शंका होती, मात्र बाजार भरणार असल्याचे समजताच पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागातून तब्बल 1560 दर्जेदार अश्व या बाजारात दाखल झाले होते. आणि पहिल्या चार दिवसातच 4 कोटींची उलाढाल देखील झाली आहे. 


अकलूज मधील घोडेबाजार देशातील मुख्य घोडेबाजार


कार्तिक यात्रेनंतर अकलूज मधील घोडेबाजार हा आता देशातील मुख्य घोडेबाजारात गणला जाऊ लागला आहे. अकलूज बाजारात उंची किमतीचे दर्जेदार घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने खास अकलूज बाजारासाठी अनेक व्यापारी ठेवणीतले घोडे विक्रीस आणत असतात. या बाजारात 50 हजारापासून 50 लाखापर्यंत घोड्यांच्या किमती असून यात पंचकल्याणी, नुखरा, अबलख, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. यात 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतच्या दर्जेदार घोड्यांच्या पिल्लांची किंमत सध्या जास्त असली तरी त्यांनाच मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. घोड्यांच्या अंगातील जन्मजात असलेले रूप, स्वभाव, शुभ गुण आणि खुणा यावर घोड्यांच्या किमती असल्या तरी त्याची चाल, रपेट, नाचकाम, रुबाबदारपणा याचीही पाहणी खरेदीदार करून त्याची किंमत ठरावीत असतात. घोड्यांचे नखरे हे त्याच्या सौंदर्याचे प्रतीक असते. या बाजारात अशाच अनेक घोड्यांचे  नखरे अश्व शॉकींना आकर्षून घेत असतात. या बाजारातील राणी या नुखरां जातीच्या अश्वाला मजबूत खुराकानंतर गरमागरम चहा प्यायला आवडतो. तर काही अश्व चालताना, उद्या मारताना विशिष्ट आवाजात फुरफुरत समोरच्या घोडीला साद घालताना दिसतात . 


'सलमान' सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र
     
बाजारात सध्या घोडयांना हलगीच्या तालावर नाचकाम शिकविले आणि त्याची प्रात्यक्षिके करणे सुरु आहे. हलग्यांचा कडकडाट सुरु झाला की, अश्वांची पावले थिरकायला लागतात आणि त्या अश्वासोबत पाहणाराही ठेका धरू लागतो. घोड्याची ऐटबाज चाल आणि धावण्याची पद्धत याचीही प्रात्यक्षिके खरेदीदारांच्या समोर केली जात असून त्यानंतर घोड्यांची विक्री होत आहे. अकलूज घोडेबाजारात 68 इंच उंच आणि धिप्पाड असा सलमान सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. देशातील सर्वात मोठा अश्व म्हणून चॅम्पियनशिप जिंकणारा सहा वर्षाच्या हत्ती घोड्याचा हा बछडा असून केवळ 2 वर्षाच्या मानाने देशातील हा सर्वात मोठा बछडा म्हणून ओळखला जात आहे. पंजाब जातीच्या या सलमानची किंमत आत्ताच 51 लाख रुपये असून याला पाहण्यासाठी भलेभले अश्व शौकीन येऊन जात आहेत. पंजाब जातीचे वडील आणि मारवाड जातीची आई असलेल्या या सलमानच्या अंगांवर अनेक सुलक्षण असल्याचे याचे बरेली येथील मालक सलीम बापू सांगतात . 


अकलूज घोडे बाजारमध्ये गर्दी


दोन वर्षाच्या मोठ्या खंडानंतर भरलेल्या देशातील या पहिल्या घोडेबाजारात किमान 15 कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा असून घोडेबाजार भरल्याची माहिती समजताच दक्षिण भारतातूनही अनेक अश्व शौकीन खरेदीसाठी अकलूज घोडे बाजार मध्ये गर्दी करू लागले आहेत .