गडचिरोली: राज्यातील नक्षलग्रस्त- संवेदनशील जिल्हा असलेल्या गडचिरोलीत दळणवळणाच्या समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. त्या दूर करण्यासाठीच्या प्रयत्नात बारमाही पाणी असलेल्या नाल्यांवर पुलांची निर्मिती केली जात आहे. मात्र केवळ पुल न उभारता सार्वजनिक बांधकाम विभागाने याला बंधारे वजा पुल अशी संकल्पना राबविल्याने रस्ते संपर्क व सिंचन या दोन्ही क्षेत्रात लाभ होत आहे. याप्रकारचा पहिला पुल नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील करेमरका येथे लोकार्पित करण्यात आला.


गडचिरोली जिल्हा हा निसर्गानं भरभरून वनसंपदा दिलेला जिल्हा मात्र या जिल्ह्याला निसर्गाच्या वरदानासह नक्षल चळवळीची काळी किनार आहे. नक्षल चळवळ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील बारमाही पाणी असलेल्या नदी नाल्यांवर पुलांची निर्मिती करून बारमाही रस्ते संपर्क स्थापित करण्याच्यादृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अशा छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असणाऱ्या धानोरा तालुक्यातल्या करेमरका या गावाजवळ एक स्थानिक नाला वर्षातील सहा महिने संपर्कात अडचण ठरत होता.


या नाल्यामुळे परिसरातील नागरिकांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटायचा. आरोग्य यंत्रणेपुढे मोठी समस्या उभी राहायची. विद्यार्थ्यांना तालुका मुख्यालय जाण्यासाठी पाण्यातून वाट काढावे लागायची. तर भर पावसाळ्यात तर सगळंच ठप्प व्हायचं. अडचणी बघून अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्यावर मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कोटींहून अधिक रुपये किंमतीच्या पुलाची निर्मिती सुरू केली. मात्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा केवळ पूल न राहता बंधारेवजा पूल असावा अशी संकल्पना मांडली.



त्यानुसार मागच्या वर्षी या पुलाच्या व बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली. पुलाची निविदा खर्चापेक्षा कमी किमतीत स्वीकारली गेल्याने शासकीय निधीची बचत झाली. त्यातूनच हा सुंदर बंधारा साकारला गेला. बांधकाम विभागाने या भागात बारमाही रस्ते संपर्क स्थापित केलाच आहे. याशिवाय या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या प्रकल्पाने मदत मिळणार आहे. 3 कोटी 65 लक्ष रुपयांचा पूल तर 40 लाख रुपयांचा बंधारा बांधून सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील नागरिकांची मोठी सोय केली आहे.


हा गडचिरोली जिल्ह्यातील पहिला असा बंधारेवजा पूल आहे. सुमारे दहा गावांना या पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार असून चार किलोमीटरपर्यंत पाणी सध्या साचले आहे. करेमरका-ढवळी -जपतलाई या गावांसह अनेक गावातील पाणी पातळी या प्रकल्पाने वाढणार आहे. याशिवाय रोजगार- शिक्षण -आरोग्य यासाठी या गावांमधून तालुका व जिल्हा स्थानी जाणाऱ्या नागरिकांना आता विनाअडसर जाता येणार आहे.


यामुळेच सिंचन -शेती व जीवनमान उंचावण्यास हा बंधारेवजा पूल लाभकारक ठरणार आहे. हा पुल आता पर्यटनासाठी महत्वाचा ठरत आहे. पुल पाहण्यासाठी लोकांची गर्दी ही सुरू झाली आहे. हा साधा पुल नसून हिरव्यागार घनदाट जंगलाने व्यापलेला  परिसरात हा टू-इन-वन पुल प्लस बंधारा असल्याने नागरिक याकडे आकर्षित होत आहेत.



गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 48 किलोमीटर वर हा पुल-बंधारा आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्यटनस्थळ असणार आहे. आजही गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात अतिदुर्गम भागात पोहोचण्यास बारमाही नाल्यांवर पुल नसल्याने अडचण होते. एखादा रुग्ण पुल नसल्याने, साधन नसल्याने दगावतो. तर एखादी महिला बाळंत होण्याआधीच आपले बाळ गमावते. अशा स्थितीत जिल्ह्यातील पुलांचे महत्त्व समजते. जिल्ह्याच्या विविध भागात अशा पद्धतीने योजनांचा कल्पक वापर करत रस्ते संपर्क आणि सिंचन यांची सांगड घातली जाण्याची गरज आहे.