पालघर : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विरारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या नालासोपारा युनिटच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. सिद्धवा जायभाये या नालासोपारा येथून आपल्या निवास्थानी पालघरला जात असताना ही घटन घडली. सिद्धवा जायभाये यांच्यावर अज्ञात इसमांनी दोन गोळ्या फायर करून फरार झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.


सिद्धवा या नालासोपारा कार्यालयातून शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या खाजगी स्विफ्ट कारमधून पालघरला घरी जात होत्या. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत नोवेल्टी हॉटेलच्या बाजूला खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी त्या थांबल्या होत्या. त्याचवेळी काळ्या रंगाच्या पल्सर बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र गोळी गाडीच्या समोरील बोनेटवर लागली, त्यामुळे सुदैवाने त्या बचावल्या. या गोळाबारात कुणालाही दुखापत झालेली नाही. फायरिंग करून दोन्ही हल्लेखोर गाडीवरच पालघरच्या दिशेने फरार झाले. सध्या आरोपी फरार आहेत.




घटनेची माहिती कळताच वसई तालुक्यातील पोलीस घटनस्थळी दाखल झाले. पालघरचे पोलीस अधीक्षक घटनास्थळावर दाखल झाले होते. फरार आरोपींना पकडण्यासाठी वसई-विरार सह संपूर्ण पालघर जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली होती. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कारवर झालेल्या गोळीबाराने पोलीस दलात खळबळ माजली आहे. मात्र हा गोळीबार का आणि कशासाठी झाला याचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही.