गोंदिया : गोंदिया शहरातील बिंदल थाट हॉटेलला मोठी आग लागली आहे. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली असून सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या आगीमुळे सात व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 25 ते 30 खोल्यांचं हे निवासी हॉटेल आहे. यापैकी पाचजणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. तसंच आणखी पाच ते सहाजण आत अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पहाटे लागलेली आग अजूनही धुमसतीच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हॉटेलमध्ये आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असून एका व्यक्तीचा मृतदेहही सापडला आहे. हे हॉटेल मुख्य बाजारपेठेत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. आगीमुळे 8 ते 10 सिलेंडर ब्लास्ट झाले आहेत, तर आणखी काही सिलेंडर आत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून गोंदियासह, अदानी, तुमसर या ठिकाणहून अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही आग अद्याप धुमसत आहे.