नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात आयकर विभागाने सुरु केलेल्या मोहिमेत देशभरात विविध ठिकाणी तब्बल 3 हजार 185 कोटींचं अघोषित उत्पन्न आढळून आलं आहे. तर 86 कोटी रुपये किंमतीच्या 2 हजारच्या नोटाही जप्त करण्यात आल्या, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.


आयकर विभागाकडून आयकर विभाग कायद्यांतर्गत 8 नोव्हेंबरनंतर देशभरात 677 ठिकाणी छापेमारी आणि चौकशी करण्यात आली. शिवाय कर चुकवणारे, हवाला कंपन्या यांना जवळपास 3100 नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.

आयकर विभागाकडून आतापर्यंत (19 डिसेंबरपर्यंत) 428 कोटी रुपयांचं सोनं आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 86 कोटी रुपये नव्या नोटांमध्ये आहेत. नव्या नोटांमध्ये जास्त 2 हजारच्या नोटांचाच समावेश आहे.

सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय यांसारख्या यंत्रणांनी देखील मनी लाँडरिंग, बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे 220 प्रकरणं समोर आणली. नोटाबंदीनंतर सर्वच संबंधित यंत्रणांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात मोहिम सुरु केली होती.

आयकर विभागाने जप्त केलेली रक्कम नियमितपणे बँकांमध्ये जमा केली. हिच रक्कम चलनामध्ये आणली जात होती. त्यामुळे चलन तुटवडा भरुन निघण्यास देखील मदत झाली.

या कारवाईदरम्यान आयकर विभागाने स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली. यामुळे बेहिशेबी मालमत्ता, भ्रष्टाचार आणि अनेक गैरव्यवहाराचे प्रकरणं उजेडात आणण्यासाठी आयकर विभागाला मदत झाली.