Nagpur News : गेल्या तीन दिवसांत 15 वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटनेनंतर बुधवारीही आगीची घटना नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात घडली. यात गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या वैजयंती ट्रॅव्हल्स बसला आग लागली. मात्र अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत गाडीचा कोळसा झाला होता. यात अंदाजे सात लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. एकीकडे नागरिक धुमधडाक्यात दिवाळी साजरी करत असताना, तर दुसरीकडे अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी फटाक्यांमुळे लागलेल्या आगीचा सामना करत होते. मागील तीन दिवसांत शहरात 15 ठिकाणी आगीच्या घटना पुढे आल्या आहेत. आग विझविता-विझविता अग्निशमन विभागाची रात्र काळी झाली. 


फटाक्यांमुळे लागली आग!


मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, बहुतांश कॉल फटाक्यांमुळे कचऱ्याचे ढीग आणि ठेवलेल्या वस्तूंमध्ये आग लागल्याचे होते. सुदैवाने एकाही ठिकाणी जीवितहानी झाली नाही. ते म्हणाले की, आता दिवाळीत फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगीच्या घटना कमी झाल्या आहेत. पूर्वी दिवाळीला आग लागल्याचे दोन डझनाहून अधिक कॉल येत होते, मात्र गत दोन वर्षांमध्ये घटना कमी झाल्या आहेत.


आगीच्या घटना...


पहिला कॉल सोमवारी सायंकाळी 5.20 वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या मंगल शारदा अपार्टमेंटमधून आला. तत्काळ कॉटन मार्केट केंद्रातील पथकाने घटनास्थळावर पोहोचून आग विझविली. त्यानंतर 7.04 वाजताच्या सुमारास कळमनाच्या काली माता मंदिरच्या मोकळ्या भूखंडावरील सामानाला आग लागल्याची माहिती मिळाली. या कॉलच्या काही वेळातच रामदासपेठच्या एक बहुमजली इमारतीच्या चवथ्या माळ्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. सिव्हिल आणि नरेंद्रनगर केंद्रातून दोन वाहन घटनास्थळावर पोहोचले. लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी हानी टळली. त्यानंतर 8.40 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन्स परिसरात लेडीज क्लब चौकाजवळील 160 खोली परिसरात आग लागल्याची माहिती मिळाली. सिव्हिल लाईन्स केंद्रातून एक दल घटनास्थळावर पोहोचले आणि आग विझवली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास तात्या टोपे हॉलजवळील एका घराला आग लागली. तात्काळ नरेंद्रनगर केंद्रातील एका पथकाने पोहोचून आग विझवली. 9.21 च्या सुमारास भीम चौकातील बाबा डेकोरोशनच्या सामानामध्येही आग लागली. सुगतनगर केंद्रातून एक गाडी घटनास्थळावर पोहोचली आणि आग विझवली. त्याचप्रमाणे, दीनदयालनगर, सावजी भोजनालय सातनवारी चौक आणि मनीषनगर परिसरात एका झाडालाही आग लावली. मंगळवारी दुपारी गांधीसागर तलावाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी लागली.


अजनीमध्ये रेल्वेच्या गोदामाला आग


अजनी परिसरात वरिष्ठ विभाग अभियंता कार्यालयाच्या गोदामाला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. 7.30 वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना गोदामातून धूर निघताना दिसला. तपासले असता गोदामात ठेवलेल्या केबर वायरच्या बंडलला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन्स, नरेंद्रनगर, कॉटन मार्केट आणि गणेशपेठ केंद्रातून 5 बंब घटनास्थळावर पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवळपास 45 मिनिटे लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात केबल वायर जळाल्याची माहिती आहे. उचके यांनी सांगितले की, आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. बंद गोदामात फटाक्यांमुळे आग लागू शकत नाही. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय खरबीच्या शक्तीमातागनर परिसरात राहणाऱ्या प्रशांत दांडेकर यांच्या घरात मंगळवारी सायंकाळी आग लागली. देवघरातील दिव्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. लकडगंज अग्निशमन केंद्रातून तत्काळ एक पथक घटनास्थळावर पोहोचले आणि आग विझवली.


पार्किंगमध्ये उभी कार पेटली


मंगळवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास कामगार नगर येथे कारला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या कॉल सेंटरवर देण्यात आली. यानंतर सुगतनगर अग्निशमन केंद्रावरुन गाडी घटनास्थळी पोहोचली. यात अंदाजे 30 हजार रुपयांचा नुकसान झाल्याचा अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.


महत्त्वाची बातमी


Nagpur Crime : विहिरीतील पाण्याच्या मोटरवरुन दोघा भावांमध्ये वाद; भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा