रत्नागिरी : रत्नागिरीच्या गुहागर येथे नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली घेतलेल्या बैलजोडीची स्पर्धा आता आयोजकांच्या अंगलट आली आहे. मुक्या प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी आयोजकांसह 25 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव य़ाचाही समावेश आहे.


तर अशा स्पर्धा च्या मागे आपण ठाम उभे राहणार आणि स्पर्धांना संरक्षण नेणार असल्याचे गुहागरचे आमदार आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तर शेतकरी नांगरणी स्पर्धा घडवीत असतात उगाच प्राणी मित्रांनी काही बोलू नये, प्राणी मित्रांनी दोन बैल पळवून पाहावेत असा टोला जाधव यांनी स्पर्धेच्या वेळी लगावला

दरम्यान, गेल्या आठवड्यात संगमेश्वर येथे देखील अशाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात एक बैल बिथरल्यामुळे पाच ते सहा जण थोडक्यात बचावले होते. खरंतर याघटनेनंतर पोलिसांनी जिल्ह्यात होणाऱ्या नांगरणी स्पर्धेची माहिती घेऊन त्या रोखणे गरजेचे होते. मात्र, गुहागरमधील या स्पर्धांची माहिती सार्वजनिक असूनही त्यावर वेळेत का कारवाई झाली नाही, असा सवाल उपस्थित केरण्यात आली आहे.

या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष विनायक मुळे आणि इम्रान घारे यांसह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आयोजक आणि स्पर्धकांवर गुन्हे दाखल होत असले तरीही अश्या जीवघेण्या स्पर्धा कायदेशीररित्या बंद करुन अशा स्पर्धा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे बनले आहे.