चंद्रपूर : ज्या रुग्णवाहिकेतून वेळेत उपचार व्हावे यासाठी रुग्णांना नेले जाते त्या रुग्णवाहिकेतून दारुची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागात रामनगर पोलिसांची कारवाई करत सुमारे 6 लाखांच्या दारुसह 16 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी यवतमाळचा रहिवासी असलेल्या राहुल वानखेडेला पोलिसांनी अटक केली आहे.
अपघात किंवा रुग्णांच्या सेवेसाठी राज्य शासनाने 108 क्रंमाकांची रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. मात्र या चांगल्या उपक्रमाच दारु तस्करीसाठी उपयोग केला जाईल, असं कुणाला वाटलंही नसेल. मात्र तसा प्रकार चंद्रपुरात घडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. दारुबंदी विरोधातील कारवाई सातत्याने सुरु असताना शहरातील बाबूपेठ भागातून गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने 108 रुग्णवाहिकेच्या आत लपवलेला दारुसाठा जप्त केला आहे. ही दारु यवतमाळहून चंद्रपुरात आणली जात होती.
पोलिसांनी या कारवाईत राहुल वानखेडे या आरोपीला अटक केली आहे. अजून दोन आरोप फरार असून पोलीस त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र रुग्णवाहिकेचे केंद्रीकृत संचालन होत असताना देखील रुग्ण नसताना रुग्णवाहिका चंद्रपुरात पोचली कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा हे 3 लगतचे जिल्हे दारुबंदी असलेले जिल्हे आहेत. सध्या या जिल्ह्यात यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमधून दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. मात्र जनसामान्यांना विश्वासाची असणारी 108 रुग्णवाहिका सेवा दारु तस्करीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
रुग्णवाहिकांबाबत सामान्य नागरिकांच्या मनात अत्यंत करुणेची भावना असते. मात्र याच 108 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अशाप्रकारे दारु तस्करी होण्याची घटना उजेडात आल्याने पुढील काळात या रुग्णवाहिकांची तपासणी गरजेची झाली आहे.