Pandharpur News Updates: मोदी सरकारच्या (Modi Sarkar)काळात हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) बनविण्याच्या चर्चा सुरु झाल्या असताना आता देशातील हिंदू मंदिरांच्या (Hindu Mandir) सरकारीकरणाच्या विरोधात नवीन लढ्याचे संकेत मिळू लागले आहेत. मुंबई येथे इस्कॉन मंदिरात वारकरी पाईक संघ आणि इतर काही वारकरी संघटनांनी डॉ सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांची भेट घेतल्यावर डॉ स्वामी यांनी याचे संकेत दिले. वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष विठ्ठल महाराज चौरे, देवव्रत राणा महाराज वासकर, रामकृष्ण वीर, माऊली पालखी संघाचे अध्यक्ष गोसावी महाराज यांच्यासह मान्यवरांनी डॉ स्वामी यांची मुंबई येथे भेट घेतली. 


यावेळी हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी डॉ स्वामी यांनी या प्रश्नाबाबत चर्चेसाठी पंढरपूरला येण्याचे मान्य केले असून येथे वारकरी संघटनांशी चर्चा करून याबाबत लढ्याची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. याची सुरुवात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापासून केली जाणार असून यासाठी पंढरपूरला स्वामी येणार आहेत. यावेळी त्यांनी हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देण्याची तयारी सुरु असल्याचे डॉ स्वामी यांनी सांगितले. यासाठी सर्व हिंदू संघटना आणि वारकरी संप्रदायाशी पंढरपूरमध्ये चर्चा केली जाणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले. दरम्यान डॉ स्वामींना आम्ही पंढरपूरला येण्याचे निमंत्रण दिले असून ते त्यांनी मान्य केल्याचे देवव्रत राणा महाराज वासकर यांनी सांगितले. 


2014 साली विठ्ठल मंदिराचा संपूर्ण ताबा शासनाकडे


हिंदू मंदिरावरील शासनाचा कब्जा काढून टाकण्यासाठी आता पुन्हा नवा लढा उभारत असून याची सुरुवात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापासून सुरु होणार आहे. जेष्ठ विधिज्ञ डॉ सुब्रमण्यम स्वामी यांची काल मुंबई येथे वारकरी संप्रदाय आणि काही हिंदू संघटनांच्या सोबत झालेल्या बैठकीत हे समोर आले आहे. आता यासाठी लवकरच डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूरमध्ये येऊन वारकरी संप्रदाय , हिंदू संघटना आणि भाविकांच्या सोबत एक बैठक घेणार आहेत. विठ्ठल मुक्तीचा लढा 40 वर्षे सुरु होता. मात्र 15 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विठ्ठल मंदिराचा संपूर्ण ताबा शासनाकडे दिला आणि मंदिरातील बडवे उत्पात यांचे हक्क संपले होते. विठ्ठल मंदिर पिढ्यानपिढ्या बडवे आणि उत्पात मंडळींच्या ताब्यात होते.  त्यांच्या कारभाराच्या विरोधात वारकरी महामंडळाने 1967 मध्ये विठ्ठल मुक्तीचा लढा सुरु केला होता. यानंतर 28 ऑक्टोबर 1968 मध्ये नाडकर्णी कमिशनची स्थापना झाली होती. या कमिशनने बडव्यांच्या विरोधात निर्णय दिल्यावर 1973 मध्ये याचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. आज याच विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कायदा 1973 नुसार मंदिराचे कामकाज चालते. यानंतरही बडवे आणि शासन यांच्यातील न्यायालयीन लढाई सुरूच होती . यातच 1985 साली मंदिराचे सर्व व्यवस्थापन शासनाकडे आले . याला बडवे समाजाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर 15 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला आणि बडव्यांच्या 40 वर्षाच्या कायदेशीर लढाईचा शेवट झाला होता.


सर्व हिंदू मंदिरे शासनाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी लढा


आता पुन्हा विठ्ठल मुक्तीचा नवीन लढा सुरु होत असून हा लढा फक्त शासनाच्या विरोधातील असणार आहे. विठ्ठल मुक्तीसोबत देशातील सर्व हिंदू मंदिरे शासनाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी डॉ सुब्रमण्यम स्वामी हा लढा देणार असून यासाठी त्यांनी वारकरी संप्रदाय आणि इतर हिंदू संघटनांच्या काही प्रतिनिधींशी याबाबत मुंबई येथे चर्चा केली. मात्र यासाठी सुरुवातीला शासनाशी चर्चा करून आणि शासनाने नाही ऐकले तर सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई करण्याची भूमिका आज डॉ स्वामी यांची असल्याचे वारकरी प्रतिनिधींनी सांगितले . डॉ स्वामी यांचा निर्णय आम्हाला खूपच अशासक वाटलं असून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे वारकरी संप्रदायातील काही धुरिणींनी सांगितले. 


विठ्ठल मंदिराची वार्षिक उलाढाल 35 कोटी रुपयांची
देशातील हिंदू मंदिरांची उलाढाल खूपच मोठी असल्याने यावर शासनाचा डोळा असला तरी इतर धर्मियांची धार्मिक स्थळे का शासन ताब्यात घेत नाही अशी हिंदू संघटनांची भूमिका आहे. तसे पहिले तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चौपट उलाढाल या धार्मिक स्थळात होत असल्याचा दावा राज्य मागास आयोगाचे सदस्य ऍड सागर किल्लारीकर यांचा आहे. तसे पहिले तर विठ्ठल मंदिराची वार्षिक उलाढाल ही देखील 35 कोटी रुपयांची आहे. विठ्ठल मुक्तीसाठी लढा सुरु होणार असला तरी मंदिरे शासनाच्या ताब्यातून मुक्त झाल्यावर त्याचेवर कोणाचे नियंत्रण राहणार हा सर्वात मोठा प्रश्न  या बैठकीला उपस्थित असणाऱ्या वारकरी महाराजांना पडला आहे . यासाठीच पंढरपूर येथे सर्व अभ्यासक , वारकरी संत , हिंदू संघटना यांची एक व्यापक बैठक घेऊन मंदिर मुक्ती नंतर काय यावर देखील चर्चा होणार आहे . डॉ स्वामी यांनी हिंदू मंदिरे मुक्तीसाठी हाती घेतलेला लढा हा देशात नवीन वाद निर्माण करणारा असला तरी याचे हिंदू संघटना स्वागत करत आहेत. मात्र ज्या विठ्ठल मुक्तीसाठी वारकरी संप्रदायाने लढा उभारला होता त्याच विठ्ठल मंदिरासाठी आता शासनाच्या ताब्यातून मुक्तीसाठी नवीन लढ्यात पुन्हा वारकरी संप्रदाय पुढाकार घेताना दिसत आहे.