Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


हिंगोली पाऊस


हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडून काढले आहे. त्यामुळे ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिऊर पुलावरून वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यात यापूर्वीच पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अतिवृष्टी होत असल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेली तीन वर्षे सतत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच सरकारकडून भक्कम नुकसानभरपाई मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केली आहे. 


भंडारा गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस


भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर भंडारा-मध्य प्रदेश राज्यमार्ग मोहाडी शहराजवळ जलमय झाला असून रस्त्यावरुन दीड ते दोन फूटावरुन पाणी वाहू लागले आहे. मोहाडीजवळ भंडारा- मध्य प्रदेश मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे या मान्सून सत्रात दुसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला आहे. यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहणाची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली आहे. 


सातारा जिल्ह्यात कोयना वगळता इतर सर्व धरणे ओवरफ्लो


सातारा जिल्ह्यात पाऊसाचा जोर कायम असून यामुळे जिल्ह्यातील कोयना वगळता इतर सर्व धरणे ही ओवरफ्लो झाली आहेत. तर कोयना धरणही भरण्यासाठी अवघा काही कालावधी लागणार आहे. वाई तालूक्यातील बलकवडी धरण 100% भरले असून बलकडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.


नागपूर पाऊस


नागपूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे.  पोहरा नदीला पूर आल्यामुळं त्याचे विहीर गावात शिरलं आहे. या गावाच्या परिसरातील काही जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना NDRF च्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. या पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.


कोल्हापूर पाऊस


कोल्हापूर शहरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.  धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरुच आहे. राधानगरी धरणाचे आतापर्यंत स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. धरणाचे एकूण 4 दरवाजे (3,4,5,6 ) उघडले गेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने मोसमात प्रथमच इशारा पातळी गाठली आहे. या पावसामुळं कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले होते.