Fertilizer Linking : शेतकऱ्यांची (Farmers) होणारी फसवणूक काही नवीन नाही. कधी बोगस बियाणे, तर कधी बोगस खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. दरम्यान याचवेळी खतांची लिंकिंग करून देखील शेतकऱ्यांची लुटमार करण्यात येत आहे. खरीप आणि रब्बी हंगामात बियाणे खरेदीच्या वेळी आणि खतांची विक्री करताना लिंकिंगचे प्रकार समोर येत असतात. तर या लिंकिंगच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागतो. मात्र लिंकिंग म्हणजे नेमके काय? हे आज आपण जाणून घेणार आहे. 


जून महिन्यात पाऊस पडल्यावर मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरवात होते. अशावेळी काही मोजक्या बियाणाची मागणी अधिक असते. तर अनेकदा कृषी व्यवसायांकडून अशा बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यानंतर ही बियाणे हवी असतील तर त्यासोबत इतर औषधे, इतर कंपनीचे बियाणे, तसेच मागणी नसलेले बियाणे विकत घेणे अनिवार्य करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांची इच्छा नसतानाही त्यांना मागणी नसलेले आणि इतर खताची आणि बियाणांची खरेदी करावी लागते. विशेष म्हणजे त्याचा आर्थिक भारही शेतकऱ्यांना झेलावा लागतो. अनेक कंपन्या जाणीवपूर्वक लिंकिंगची सक्ती व्यापाऱ्यांवर करतात आणि तीच सक्ती कृषी चालक शेतकऱ्यांवर करतात. 


'एबीपी माझा'ने केलं होतं स्टिंग ऑपरेशन...


राज्यात पेरण्या सुरु होताच कृषी चालकांकडून वाढीव दरात बियाणे विकणे आणि लिंकिंगचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात 'एबीपी माझा'ने स्टिंग ऑपरेशन करत लिंकिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांचं पर्दाफाश केला होता. पैठण शहरातील एका दुकानात बियाणे विकत घेण्यासाठी गेल्यावर 'कबड्डी'  या वाणाची मागणी करण्यात आली. तेव्हा कब्बडी वाण घेण्यासाठी इतर बियाणे घेण्याची सक्ती कृषी चालकाकडून करण्यात आली. सोबतच काही औषधे घ्यावेच लागणार असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे अशीच काही परिस्थिती जिल्ह्यातील इतर भागात पाहायला मिळाली. 


खतांची लिंकिंग जोरात...


खरीप हंगामाची पेरणी झाल्यावर पिकांच्या वाढीसाठी आणि फळांच्या वाढीसाठी रासायनिक खतांची मागणी वाढते. दरम्यान मागणी वाढल्याने याचा फायदा काही कृषी केंद्र चालक आणि खताच्या कंपन्या घेतात. ज्या खताची मागणी अधिक असते त्याची लिंकिंग केली जाते. मागणी असलेलं खत हवे असल्यास तर सोबत इतर खत किंवा औषध घेण्याची सक्ती करण्यात येते. अन्यथा खत देण्यास नकार दिला जातो. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना खतासोबत इतर खत आणि औषध घ्यावी लागतात. तसेच आर्थिक भार देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतो. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार; कृषिमंत्र्यांची घोषणा