Mumbai Potholes: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दमदार पाऊस (Mumbai Rain) झालेला आहे आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे मुंबई परिसरामध्ये रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. याच खड्ड्यातून वाट काढत मुंबईकरांना प्रवास करावा लागत आहे, मुंबईत पडलेल्या खड्ड्यांनी मुंबईकर अक्षरश: हैराण झाले आहेत. 


मुंबई महापालिकेने मागील चार महिन्यांमध्ये मुंबईतील 6,000 खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. पण असं असलं तरी त्या खड्ड्यांमध्ये मुंबईतील बहुतांश खड्ड्यांचा नंबर लागलेला नाही. मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे ट्राफिकचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे कार्यालयात पोहोचण्यास उशीर आणि घरी जाण्यासाठी देखील उशीर होत आहे. अनेक वाहनचालकांना पाठीचा त्रास उद्भवत असल्याने मुंबईकरांना खड्ड्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.


मुंबईच्या रस्ते देखभालीसाठी लाखो रुपये खर्च करून दरवर्षी महापालिका काही महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्टर नेमते. तरीही मुंबईतल्या जोगेश्वरी-जेव्हीएलआर रोड ते विक्रोळी रोडवर देखील रस्त्यावर खड्डे पाहायला मिळत आहेत, मात्र कोणीही कुठेही खड्डे बुजवताना दिसत नाही.


मुंबईतल्या जेव्हीएलआर रोडला जोगेश्वरी पासून विक्रोळी परिसरापर्यंत काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात या रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरते 45 दिवसांसाठी कंत्राट नवदीप कन्स्ट्रक्शन, पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन यांना दिले होते. तर ज्या परिसरामध्ये एमएमआरडीएची हद्द आहे, त्या परिसरात कुमार नामक कॉन्ट्रॅक्टर खड्डे बुजवण्याचं काम करत आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पण त्यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. पावसाळ्यात यापूर्वी एक-दोन वेळा हे खड्डे बुजवल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं.  मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डे दिसत असून कॉन्ट्रॅक्टर कुठेही खड्डे बुजवताना दिसले नाही.


मुंबईत कुठे खड्डे पाहायला मिळत आहेत?



  • जेव्हीएलआर रोड

  • वेस्टन एक्सप्रेस हायवे

  • इस्टर्न एक्सप्रेस हायवे

  • मुंबई सेंट्रल एसटी स्टॅन्ड 

  • सायन, प्रतीक्षा नगर

  • विक्रोळी T जंक्शन परिसरातील रोडवर

  • कुर्ला

  • धारावी परिसरातल्या रस्त्यांवर

  • वांद्रे पूर्व

  • मुंबईतील इतर परिसरात


मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी 2015 साली महापालिकेने कोलमिक्स तंत्रज्ञान आणलं. त्यानुसार पाऊस सुरू झाल्यानंतर खड्डे पडले तेव्हा खड्डे बुजवण्याचं काम एक-दोन वेळा कोलमिक्सने करण्यात आलं, मात्र पावसामुळे ते काम पुन्हा खराब झालं आहे. त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाला विचारणा केली असता  आता पुढील काळात मास्टीकने हे खड्डे बुजवण्याचं काम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पुढील काळात तरी मुंबईकरांना खड्डे, ट्राफिक यामुळे होणारा मनस्ताप कमी होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


हेही वाचा:


Maharashtra Monsoon Session : विधीमंडळात गाजला खड्ड्यांचा मुद्दा, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक