सांगली : मुलीला मारहाण केल्याच्या रागातून सासऱ्याने जावयाला जबर मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना मिरज तालुक्यातील सावळी गावामध्ये घडली आहे. पतीकडून मारहाण झालेल्या महिलेची प्रकृती देखील गंभीर आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

जानेश्वर बामणे असे मयत इसमाचे नाव आहे. जानेश्वर जत्रेच्या निमित्ताने सावळी या आपल्या सासरवाडीमध्ये आला होता. मात्र काही कारणावरून सासरवाडीमध्येच जानेश्वर आणि त्याची पत्नी गीतांजली बामणेचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात जानेश्वरने गीताजंलीला जबर मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर आपल्या मुलीला मारहाण केली म्हणून गीतांजलीचे वडील आण्णासो शिंदेने जावई जानेश्वर बामणेला खांबाला बांधून घालून मारहाण केली.

या मारहाणीत जानेश्वरचा मृत्यू झाला. ही घटना समजताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. आण्णासो शिंदेच्या बरोबर जानेश्वरला खांबाला बांधून आणखी किती जणांनी मारहाण केली, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मयत जानेश्वरचा सासरा आण्णासो शिंदेला ताब्यात घेतले आहे.