सोलापूर : केंद्र सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबर 2019 पासून टोल नाक्यावर चारचाकी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे. चारचाकी वाहनचालक अनावधनाने जर फास्टटॅगच्या विशेष लेनमध्ये आला तर त्या वाहनचालकांना दुप्पट रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.


ज्या वाहनांवर फास्टटॅगचे स्टिकर लावलेले आहेत, त्या वाहनचालकांसाठी विशेष लेन प्रत्येक टोल नाक्यावर असणार आहे. केंद्र सरकारच्या 21 नोव्हेंबर 2014 च्या राजपत्रानुसार ही कार्यवाही  केली जाणार आहे. या राजपत्रानुसार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 19 जुलै 2019 रोजी विशेष निर्देश पत्रही जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, एक डिसेंबर 2019 पासून टोल फास्टॅगच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांनी जर फास्टॅगसाठीच्या लेनमध्ये प्रवेश केल्यास अशा वाहनांकडूनही दुप्पट टोल आकारला जाणार आहे. फास्टटॅग लेनवर तसे सूचनाफलक देखील लावण्यात येणार आहे.
फास्टटॅग काय आहे ?

फास्टटॅग एक पातळ इलेक्ट्रॉनिक चिप आहे. ही चिप वाहनांच्या पुढील भागात दिसेल अशी चिकटविण्यात यावी . चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईल. ही चिप ग्राहकांच्या बँक अकाऊंटला जोडता येते.

फास्टॅग कोठे मिळेल? 

आयसीआयसीआय, एचडीएफसी, अक्सिस, इंडस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा, गूगल प्लेस्टोअरवर My FASTag या मोबाईल ॲप्लिकेशन वरूनही खरेदी करता येईल. तसेच AMAZON, PAYTM,कोणत्याही टोलनाक्यावर आणि पेट्रोलपंपावर सहज उपलब्ध होणार आहे.

फास्टॅग खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे 

वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट, वाहनधारकांचे पासपोर्ट साईज फोटो, केवायसीसाठी कागदपत्रे ( वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार ओळखपत्र किंवा पासपोर्ट )

फास्टॅगचे फायदे

वाहनचालकांना टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा यापुढे दिसणार नाही. इंधन बचत, पर्यावरण संवर्धन, वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. फास्टॅगवर कॅशबॅक मिळणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार फास्टॅगद्वारे टोल देणाऱ्या वाहनांना 31 मार्च 2020 पर्यंत 2.5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

फास्टटॅग कसे काम करते?

फास्टटॅग चिकटवलेले वाहन पथकर नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला टोल वाहनचालकाच्या बॅँक खात्यातून किंवा आॅनलाइन पेमेंट खात्याच्या वॉलेटसोबत फास्टटॅग जोडलेल्या खात्यातून वजा होणार आहे. फास्टटॅग ओळखण्यासाठी पथकर नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याव्दारे फास्टटॅग चिप ओळखली जाईल. चिप स्कॅन झाल्यावर टोल नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाणार आहे . त्यामुळे वाहनांना थांबण्याची गरज नाही.