नवी दिल्ली : "राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्त्वात सरकार येईल," असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी महाराष्ट्रात स्थिर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तर शरद पवार यांनी काल (18 नोव्हेंबर) दिल्लीत टाकलेल्या गुगलीवर विचारलं असता पवार समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपने आम्हाला धोका दिला. तसंच भाजपने शिवसेनेच्या रुपाने चांगला मित्रपक्ष गमावल्याचा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

शिवसेनेच्या नेतृत्त्वात कार्यक्षम सरकार बनेल
शिवसेनाच राज्यात सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वात मजबूत, स्थिर आणि आतापर्यंतचं कार्यक्षम सरकार बनेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसंच सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नसून फक्त माध्यमांच्या मनात हा गोंधळ असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पवारांना समजायला 100 जन्म लागतील
शरद पवार यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत गुगली टाकली. त्यांच्या या वक्तव्या शिवसेना चांगली बुचकळ्यात पडली. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार अशीही चर्चा रंगली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "मला शरद पवारांवर अजिबात शंका नाही, डिसेंबरआधी आम्ही सरकार स्थापन करु. पुढे ते म्हणाले की, "भाजपच्या मुंबईतील नेत्याने मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायला संजय राऊतांना 25 जन्म लागतील. तसंच मी या देशातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, माननीय शरद पवार यांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील."

काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची आजची बैठक रद्द
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील आजची बैठक टळली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज होणारी बैठक आता उद्या होणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत असा निर्णय झाला होता की, दोन्ही पक्षांचे नेते पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा करतील.