नवी मुंबई: शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नेहमीच माथाडी कामगारांवर टीका करतात, त्यामुळे माथाडी कामगार संघटनेने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला नाही, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

तसंच महाराष्ट्र बंदची हाक देवूनही नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आवक समाधानकारक असल्याचा दावाही त्यांनी केला.

एपीएमसी मार्केट बंद करण्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या माथाडी कामगारांनी या संपात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी प्रतिनिधींनी आजपर्यंत नेहमीच माथाडी कामगारांना दोष दिला, संघटनेच्या नावाने बोटे मोडली, त्यामुळे आपणही त्यांच्यापासून चार हात लांब राहिल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

शेतकरी प्रतिनिधींनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला, फळं आणि कांदा- बटाटा आवक समाधानकारक झालेली आहे. संप पुकारुनही गेल्या तीन दिवसांपेक्षा आज आवक वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

आज भाजी मार्केटला 475 गाड्यांची आवक झाल्याची नोंद झाली आहे. कांदा 61 बटाटा 64 आणि फळांच्या जवळपास 350 गाड्या आलेल्या आहेत. यामुळे दरही 20 टक्क्यांनी उतरले आहे.