मुंबई : साताऱ्याहून मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज मंत्रालयावर धडकणार आहे. शेतकऱ्यांना थेट मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता. परंतु पोलिस शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आपल्याच गाडीतून मंत्रालयात नेणार आहेत. चेंबूरमधील साधू वासवानी हायस्कूलमध्ये या शेतकऱ्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. शेतकरी किसान मंच या संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं होतं.
साताऱ्याच्या खंडाळ्याहून मुंबईत दाखल झालेल्या अर्धनग्न अवस्थेतील शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आज सकाळी 11 वाजता उद्योगमंत्र्यांसोबत या शेतकऱ्यांची चर्चा होणार आहे. "मात्र चर्चेतून मार्ग निघाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करु," असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
गेल्या 10 वर्षांपासून या भूसंपादनाला शेतकरी विरोध करत आहेत, मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचं अस्त्र उपसलं होतं. खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपूर्वी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये त्यांना पोलिसांनी अडवलं. यावेळी मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी वाहतूक कोंडीचं कारण दिलं होतं.
सातारा जिल्ह्यातल्या धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकरी खंडाळ्याहून अर्धनग्नावस्थेत पायी चालत आले होते.
एबीपी माझाने सातत्याने या शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. त्यांच्या व्यथा, त्यांचा आक्रोश जनतेसमोर मांडला. त्यानंतर सरकारला जाग आली असून, उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी या शेतकऱ्यांना वेळ दिली आहे. त्यानंतर शांततेच्या मार्गाने चाललेलं हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन स्थगित
अर्धनग्न मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुंबईच्या वेशीवर अडवलं