सोलापूर : राज्यात सर्वत्र पावसाचे जोरदार धुमशान सुरु असताना उजनी धरण परिसरात मात्र पावसाची अवकृपा असल्याने जे धरण गेल्यावर्षी 109 टक्के होते ते आज केवळ 65 टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी केव्हा भरणार याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे. उजनी ही सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असल्याने धरण 100 टक्के भरल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी निर्धास्त बनत असतो. मात्र यंदा राज्यभर सर्वत्र चांगला पाऊस सुरु असताना उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजा रुसला की काय म्हणायची वेळ आली आहे. 


शेवटच्या टप्प्यात पुणे परिसरात थोडासा पाऊस सुरु झाल्याने आता धरणात बंडगार्डनचा विसर्ग दहा हजार क्युसेकच्या पुढे गेल्याने आणि  चासकमानमधून ही पाणी सोडल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. भीमा खोर्‍यात अनेक धरणांवर गेल्या दोन तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने पाणी सोडण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. भीमेवरील चासकमान धरण शंभर टक्के भरल्याने आता यातून 3685 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर पुणे बंडगार्डनचा विसर्ग ही वाढून 10 हजार क्युसेकच्या पुढे गेल्याने उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या दौड परिसरातून 7410  क्युसेक पाणी उजनीत मिसळत आहे. 


नीरा धरणांच्या परिसरात होत असलेल्या पावसाने देवघर व भाटघर धरणांचे दरवाजे उघडले आहेत. भाटघरमधून 7 हजार क्युसेकने पाणी वीर धरणात सोडले जात आहे. तर दुसरीकडे भीमा खोर्‍यातील मुळा व मुठा उपखोर्‍यात दोन दिवसात चांगला पाऊस नोंदला गेला असल्याने खडकवासला साखळी धरणातील शंभर टक्के भरलेल्या वरसगावमधून साडेचार हजार क्युसेकने पाणी पुढे  सोडले जात आहे. यास भीमा खोर्‍यातील कासारसाई, आंध्र व कलमोडी प्रकल्प भरले असल्याने यातून ही नद्यांमध्ये पाणी सोडणे सुरू करण्यात आले आहे.


मागील चोवीस तासात वडीवळे 49 मिमी, मुळशी 56, टेमघर 52, वरसगाव 31, पानशेत 31, कलमोडी 24, पवना 19 यासह अन्य प्रकल्पांवर पावसाची नोंद आहे. दरम्यान भीमा व नीरा खोर्‍यातील 25 पैकी 17 धरणं ही नव्वद टक्क्याहून अधिक भरलेली आहेत. यामुळे आता तेथील मोठ्या धरणात पाणी साठवण्याची जागा नसल्याने हे भीमा खोर्‍यातील पावसाचे पाणी उजनीला मिळणार आहे. तर नीरा खोर्‍यातील पावसाचे पाणी वीर भरल्यानंतर पुढे नीरा नदीत सोडावे लागणार आहे. सध्या वीर धरण 80 टक्के  भरले आहे तर मागील गुंजवणी ,देवघर व भाटघर हे प्रकल्प क्षमतेने भरले आहेत.


भीमा उपखोर्‍यातील चासकमान, कलमोडी, आंध्रा ही धरण शंभर टक्के तर भामा 95 तर वडीवळे 92 टक्के भरले आहे. मुळा मुठा उपखोर्‍यातील पवना, कासारसाई, टेमघर, वरसगाव, पानशेत हे क्षमतेने भरले आहेत. तर मुळशीत 92 तर खडकवासला धरणात 94 टक्के पाणीसाठा आहे. घोड उपखोर्‍यातील वडज व डिंभे हे दोन प्रकल्प 90 टक्क्यांच्या पुढे भरले आहेत. अन्य प्रकल्प हळूहळू वधारत आहेत.