Sadabhau Khot on Devendra Fadnavis : राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी अत्युंत चुरशीची लढत झाली, यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. यावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे. 'मी पुन्हा येईन म्हणत देवेंद्रजी फडणवीस ह्यांची पावलं पडली आणि विरोधकांची गढी डगमगली', असे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. तसेच आधुनिक महाराष्ट्राचे चाणक्य म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असंही खोत म्हणालेत.


विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला


राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. धनंजय महाडिक यांना 41.5 मतं मिळाली आहेत. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. राज्यसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेली मतं पाहता महाविकास आघाडीची चिंता निश्चितपणे वाढली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरुन शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  


 




भाजपला तीन जागा, महाविकास आघाडीलाही तीन जागा 


मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मत आणि महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक हे सर्व पाहिल्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला.  राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती.  या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


महत्वाच्या बातम्या: