Sadabhau Khot : राज्य सरकारनं एक रुपयांमध्ये पीक विमा योजना राबवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर राज्य शासन सकारात्मक असल्याचे दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. विम्याच्या माध्यमातून सरकार पशुधनाचे दायित्व स्वीकारेल असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
लंपी रोगाच्या पार्श्वभुमीवर जनावरांना लसीचा दुसरा डोसही मोफत देण्यात येईल. तसेच दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस प्रशासन, FDA यांना सोबत घेऊन संयुक्त समिती बनवण्याचे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले.
दुधाला 35 रुपये लिटरचा दर द्यावा
दूध खरेदी दर हा राज्यात एकसारखा असावा आणि तो 35 रुपये लिटर देण्यात यावा अशी भूमिका राज्याचे दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचे विखे पाटील यांचे अभिनंदन केलं आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळं तोटा सहन करावा लागत असल्यानं रयत क्रांती संघटनेनं दूध परिषद घेतली होती. तसेच दूध दर कमी झाल्यानं याबाबत तात्काळ बैठक लावण्यासाठी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात बैठक घेतली होती. यामध्ये दुधाला 35 रुपये दर देण्याचे निर्देश विखे पाटलांनी दिले आहेत.
अभ्यास करुन दूध संघांच्या नफ्याचा हिस्सा उत्पादकांना मिळावा
खासगी आणि सहकारी दूध संघांनी दुधाला किमान 35 रुपये प्रति लिटर असा खरेदी दर द्यावा. तसेच दूध संघांच्या व्यवस्थापनाच्या खर्चाचाही अभ्यास करुन नफ्याचा हिस्सा उत्पादकांना मिळावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन बैठकीत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या :