24th June In History: आजचा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या, महिलांना त्यांच्या प्रश्नावर संघटीत करणाऱ्या मृणाल गोरे यांचाही जन्मदिन आहे. 



1869: दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म


19व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे ब्रिटीश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या करण्यात सहभागी असणारे चाफेकर बंधूंपैकी दामोदर चाफेकर यांचा आज जन्मदिवस. बाळकृष्ण चाफेकर आणि वासूदेव चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवले. वॉल्टर चार्ल्स रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला.  22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी रँडची गोळ्या झाडून हत्या केली. 


दामोदर चाफेकर यांना मुंबईत अटक झाली आणि 18 एप्रिल 1898 रोजी येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. दामोदर चाफेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. पुढे ‘हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त’ या नावाने विठ्ठल गोपाळ खोबरेकर यांनी संपादित करून ते प्रकाशित केले. 


1899: मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा जन्म


मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म झाला. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा त्यांनी मराठी रंगभूमीवर जिवंत ठेवली. गोपाळ गोविंद फाटक हे त्यांचे मूळ नाव. मात्र, या नावापेक्षा त्यांचे नानासाहेब फाटक हेच नाव अधिक प्रसिद्ध झाले. मराठी रंगभूमीवरील त्यांचे नटसम्राट हे नाटक एवढे गाजले की त्यापुढे त्यांच्यामागे कायमच नटसम्राट ही उपाधीच लावली गेली. रक्षाबंधन या नाटकातून त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. ‘थोरातांची कमळा’ चित्रपटातील त्यांनी साकारलेली शिवाजीची भूमिका चांगलीच गाजली होती. ‘एकच प्याला’मधील सुधाकर लोकप्रिय ठरला. 


1928: महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म


मुंबईत 'पाणीवाली बाई' म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोकनेत्या मृणाल केशव गोरे अर्थात सामान्यांच्या मृणालताई यांचा आज जन्मदिवस. मृणालताई या समाजवादी नेत्या होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले.  मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. 1972 मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. सहाव्या लोकसभेत 1977 मध्ये त्या उत्तर मुंबईतून खासदार म्हणून निवडून गेल्या. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मृणाल गोरे यांना विरोधकांकडून हार पत्करावी लागली होती. 1985 ते 1990 या कालावधीत मृणालताई गोरे या विधानसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यावेळी त्यांनी अत्यंत तडफेने सामान्य माणसांचे प्रश्न मांडले. महिलांच्या अनेक समस्यांवर त्यांनी सरकारला भूमिका घेण्यास भाग पाडले. 


मुंबई महापालिका हद्दीत येण्याआधी गोरेगावमध्ये ग्रामपंचायत होती. मृणाल गोरे या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्या होत्या. गोरेगाव मुंबई महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर मृणाल गोरे या नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. 1964 मध्ये पाण्याच्या मुद्यावरून झालेल्या हिंसक संघर्षात 11 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर मृणाल गोरे यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. त्यावेळी महापालिकेच्या नियमानुसार झोपडपट्टीला पाणी पुरवठा करण्यास बंदी होती. पाणी हा सगळ्यांचा अधिकार असल्याचे सांगत मृणाल गोरे यांनी हा नियमात बदल करण्यास महापालिकेला भाग पाडले. मृणाल गोरे यांनी आणीबाणीत 18 महिने तुरुंगवास भोगला होता. 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी प्रचारात"पानीवाली बाई दिल्ली में, दिल्लीवाली बाई पानी में" ही घोषणा गाजली. केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर आली होती. त्यावेळी त्यांनी मंत्रिपद नाकारले. 


जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांच्या विरोधात 1972 मध्ये 'लाटणे मोर्चा' काढला होता. महागाईविरोधात मृणाल गोरे, कॉम्रेड अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड तारा रेड्डी यांच्या नेतृत्वात मोठी आंदोलने झाली. समाजवादी विचार केवळ बोलून दाखविण्यापुरता नाही तर प्रत्यक्षात यावा यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले. कमाल जमीन धारणा कायद्याच्या नुसार जमिनीची मागणी सरकारकडे करत गरीब, गरजू लोकांसाठी घरांच्या प्रश्नावर आंदोलन उभारले. मुंबईतील उपनगरातील गोरेगाव परिसरात नागरी निवारा परिषदेमार्फत जमीन मिळवून त्यावर गरीब, गरजू लोकांच्या खिशाला परवडतील अशी घरे बांधण्याचा अभिनव प्रकल्प मृणालताई गोरे आणि समाजवादी नेते प. बा. सामंत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. जवळपास 6 हजार कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला.  1958 मध्ये मृणाल गोरे यांचे पती आणि समाजवादी चळवळीचे नेते बंडू गोरे यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर पुढे मृणाल गोरे यांनी केशक गोरे स्मारक ट्रस्ट स्थापन केला. त्या माध्यमातून त्यांनी विविध लोकोपयोगी कामे केली. महिलांसाठी स्वाधार केंद्र सुरू केले. 


इतर महत्त्वाच्या घडामोडी: 


1893: वॉल्ट डिस्नेचे सह-संस्थापक रॉय ओ डिस्ने यांचा जन्म
1897: ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म
1940: दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
1982: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.