परभणी: एकीकडे पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात आता चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. हेच काय कमी आता लम्पीमुळे (Lumpy) देखील चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय. गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यंदा काहीतरी हाती लागण्याची अपेक्षा होती. मात्र, यंदा एकामागून एक शेतकऱ्यांसमोर संकटाचे डोंगर उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यंदा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या संकटाचा सामना करत असतानाच आता शेतकऱ्यांसमोर जनावरांमधील लम्पी आजाराचं संकट देखील उभं राहिला आहे.


परभणी जिल्ह्यातील 144 गावांतील जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या रोगाच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण 768 जनावरे दगावले आहेत. विशेष म्हणजे या आजाराची जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 144  गावांमधील जनावरे बाधित आढळून आले आहेत. या गावांमध्ये 5 हजार 507 जनावरे बाधित आढळून आली. त्यापैकी 3 हजार 570 जनावरांवर उपचार करून ती बरी झाली आहेत. तर, आतापर्यंत 768 जनावरांचा मृत्यू झाला आहे. बाधित गावापासून 5 किमी परिघातील 626 गावे हे प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये 2 लाख 80 हजार 397  जनावरांचा समावेश आहे. तर, जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून दगावलेल्या जनावरांपैकी 305 जनावर मालकांना 50 लाख 85 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पण, सध्या वाढत असलेल्या लम्पीमुळे शेतकऱ्यांची आणि पशुपालकांची चिंता वाढली आहे. 


शेतकरी तिहेरी संकटात...


पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर पहिलं संकट निर्माण झाले. जून महिन्यात सुरवातीलच पाऊस उशिरा दाखल झाला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. पण ऑगस्ट महिना कोरडा गेला. सप्टेंबर महिन्यात किंचित आलेल्या पावसाने पिकांना जीवनदान दिले. पण, पुढे गायब झालेला पाऊस 20 दिवस उलटूनही परतला नाही. त्यात आता पावसाचे 10 दिवस शिल्लक असून, या काळात देखील मोठ्या पावसाची अपेक्षा नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी चाऱ्याचे बियाणे मिळावे म्हणून जिल्हा परिषदकडे अर्ज केले आहेत. असे असतांना आता अनेक जिल्ह्यात लम्पीचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या तिहेरी संकटाचा कसा सामना करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada : मराठवाड्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव; तब्बल 8 हजार 60 पशुपालकांची मोफत बियाण्यांसाठी अर्ज