नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर येथील युवा शेतकऱ्याने परिश्रमातून टमाट्याची उत्तम शेती केली असून भरघोस नफा कमावला आहे. अडीच एकरमध्ये आतापर्यंत साडेसहा लाखाचे उत्पन्न झाले असून अजून पाच लाखापर्यंत उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्याला आहे. नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गवर शेती असून दर्जेदार टमाटे असल्यामुळे जाग्यावरूनच व्यापारी खरेदी करत आहेत.

भाजीपाल्याच्या शेतीतुन नवनवीन प्रयोग घेऊन उत्पादनात वाढ


नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर युवा शेतकरी सुमेध रामराव देशमुख यांची शेती असून त्यांचे वाणिज्य शाखेत पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे. भाजीपाल्याच्या विविध पिकांची लागवड करून नवनवीन प्रयोग सुरू असतात.


घरीच रोपे तयार करून केली लागवड


टोकिटा विश्वनाथ कंपनीची रोपे घरीच तयार करून 5 बाय 2 अंतरावर लागवड केले. तसेच बेडवर ही रोपे लागवड करून ठिबक सिंचन जोडण्यात आले. तसेच बांबू व बांधीव तार वापरून टमाट्याची रोपे दोरीने बांधण्यात आले.


काळजीपूर्वक घेतली निगा


शेतकऱ्याने सदरील टमाट्याचा प्लॉट चांगला आणण्यासाठी भरपूर मेहनतही घेतली. शेतात तण होऊ न देण्यासह विविध काळजी घेत द्रवरूप खते व फवारणी नियमितपणे चालू ठेवले. चांगला प्लॉट आणून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकाचे व व्यापाऱ्याचे लक्ष्य वेधले.


जाग्यावरूनच होतेय खरेदी!


चांगल्या व लक्ष्य वेधणारी टमाट्याची फळे दिसू लागल्यामुळे ग्राहकही चांगला मिळत आहे. व्यापारी शेतात येऊन जाग्यावरूनच खरेदी करत आहेत. मालाची प्रतवारी करून माल ठोक व्यापारी खरेदी करत असून नांदेड, हिंगोली, उमरखेड, वसमतच्या बाजारात किरकोळ विक्री केला जात आहे. दररोज दहा मजुरांना यानिमित्ताने रोजगार मिळत आहे.

आतापर्यंत साडे सहा लाख उत्पन्न


ऑगस्टपासून टमाट्याच्या शेतीला प्रारंभ केला असून दोन टप्प्यात लागवड करण्यात आली. एक एकरचा प्लॉटमध्ये दीड हजार कॅरेट निघाले आहेत. अॅव्हरेजमध्ये पाच लाखाचे उत्पन्न निघाले आहे. सध्या दीड एकर क्षेत्र सुरू असून आतापर्यंत चारशे कॅरेट निघाले आहेत. आता पर्यंत त्यात दीड लाखाचे उत्पन्न निघाले आहे. दोन्ही मिळून साडे साडेसहा लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले आहे. तसेच दीड एकरमध्ये अडीच हजार कॅरेट उत्पन्न अपेक्षित आहे. या पिकासोबत वांग्याची व मिरचीची लागवड करण्यात आली असून वांग्याचीही 600 कॅरेट निघाली असून तीन लाखाचे उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे.