सांगली : शेतीपूरक व्यवसायाशी निगडीत कडकनाथ कोंबडी पालनातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 8 हजारावर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आता धूम ठोकली आहे. कडकनाथ कोंबडी पालनाशी संबंधित कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती असून सुमारे आठ हजार गुंतवणूकदारांची 500 कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे.


शेतीला जोड धंदा म्हणून कडकनाथ कुक्कुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करुन रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याच्या नावाखाली सांगली जिल्ह्यातील एका कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांची लूट या कंपनीने केली आहे. गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकत नसल्याने राज्यातील अनेक कार्यालयांना टाळे ठोकून कंपनीचे संचालक फरार झाले आहेत.


गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने या कंपनीच्या संचालकांनी पुणे येथे मुक्काम ठोकला आहे. आता अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कंपनीने 100 रुपयांच्या मुद्रांकावर अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. आमची कंपनी प्रामुख्याने रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन व शेळी पालनाचा व्यवसाय करत आहे. लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करुन देणे तसेच व्यवसायातून उत्पादित होणारा माल खरेदी करणे याबरोबरच शेतकऱ्यांना विश्वास देऊन खरेदीची कंपनी हमी देते.


आमची कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत नाही, असं सांगत कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या मुद्रांकावर बोगस स्वाक्षऱ्या असून त्यावर नावाचा उल्लेख नाही. संदीप आणि सुधीर मोहिते या कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगावच्या दोन भावानी 2 वर्षापूर्वी ही कंपनी स्थापन केली होती. आणखी काही जणांचा या कंपनीत सहभाग आहे.


शेतकऱ्यांची फसवणूक


वाळवा तालुक्यातील कापूरवाडी येथील संतोष कदम यांनी 600 कडकनाथ कोंबड्याचे शेड उभारले आहे. 7 लाख 20 हजार रुपये या व्यवसयात गुंतवले, मात्र आता तो अडचणीत आला आहे. दीड महिन्यात 75 हजार खाद्यावर खर्च केले आहेत. हजारो अंडी घरात पडून आहेत. कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी आता हाती पैसा नसल्याने झाडाची पाने या कडकनाथ कोंबड्यांना घालण्याची वेळ संतोषवर आली आहे. बायकोच्या बचतगटावर कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून संतोषने हा व्यवसाय वाढवला, मात्र आज हा व्यवसायच अडचणीत आल्याने या संतोषवर संकट ओढवलं आहे. संतोष सारखीच स्थिती अनेकांची आहे.


रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका


सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवित गुंतवणुकीची भन्नाट योजना सुरू केली आहे. ‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असं या योजनेचे स्वरुप आहे. यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पक्षी घेताना 40 हजार आणि राहिलेले 35 हजार 3 महिन्यांनतर अशा दोन टप्प्यात रक्कम घेतली जाते. या कालावधीत 200 पक्षांच्या युनिटसाठी कंपनीकडून खाद्य, औषधे, लस, भांडी दिली जातात.


तीन महिन्यानंतर कंपनी शेतकर्‍याकडे 100 मादी आणि 20 नर ठेवून 80 पक्षी घेऊन जाते. 4 ते 5 महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणे सुरु केल्यानंतर कंपनी पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50, दुसरी दोन हजार अंडी 30 व तिसरी 3500 अंडी 20 रुपये या दराने घेऊन जाते. यातून शेतकर्‍याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे तीन लाख देण्याचे आमिष दाखविले. 75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसेच दोन टप्प्पात रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले आहेत.



कंपनीच्या संचालकांनी सुरवातीला पहिल्या सहा महिन्यात हा फंडा वापरुन सांगली, सातारा जिल्ह्यांतील काही शेतकर्‍यांना परतावा दिला. विश्वास संपादन झाल्याने शेतकर्‍यांचा गुंतवणुकीचा ओघ वाढत गेला. पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील शेतकर्‍यांकडून मिळालेले पक्षी इतरांना देऊन कंपनीने आपला पसारा राज्यभर वाढविला. एजंटमार्फत अनेक शेतकर्‍यांना कोंबड्या पाळावयला लावल्या. बहुसंख्य ठिकाणी पॉश कार्यालये थाटून, यश कथा सांगून सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, माढा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर यासह अनेक ठिकाणी जाळे पसरले. या आमिषाला भुलून हजारो शेतकर्‍यांनी रक्कम गुंतविली आहे.


शेतकर्‍यांचे 300 ते 400 कोटी रुपये अडकल्याची शक्यता


या प्रकल्पात उत्पादित झालेली अंडी व पक्षी पंचतारांकित हॉटेलात मोठ्या भावाने जात असल्याची हाकाटी पिटण्यात आली. पण प्रत्यक्षात त्यांची विक्रीच होत नव्हती. तर उत्पादित झालेली अंडी व पक्षी गुंतवणूक करणार्‍या इतर शेतकर्‍यांना दिली जात होती. विक्रीच होत नसल्याने व प्रकल्पास गुंतवणूक कमी होऊ लागल्याने पुढे चालणारी साखळी ठप्प झाली. परिणामी शेतकर्‍यांना दिल्या जाणारा परताव्याची उधारी वाढू लागली. हळूहळू शेतकर्‍यांची थकीत रक्कम वाढत गेली.


दररोज शेकडो शेतकरी या कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे घालू लागले. यामुळे कंपनीचे बिंग फुटले आहे. देणेकर्‍यांची संख्या व रक्कम वाढू लागल्याने कंपनीच्या संचालकांनी कार्यालयांना कुलूपे ठोकून पोबारा केला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहे. सुमारे 8 हजार शेतकर्‍यांचे सुमारे 300 ते 400 कोटी रुपये यात अडकले असल्याची प्राथमिक शक्यता आहे. काही शेतकर्‍यांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून कंपनीचे संचालक गायब झाले आहेत. संचालक व कर्मचार्‍यांचे मोबाईल बंद आहेत. दोन महत्वाचे संचालक पुण्यात असल्याची चर्चा आहे.


महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सर्वेसर्वा सुधीर मोहिते या सर्व गोष्टींना मी स्वतः जबाबदार आहे. तसेच महारयत अॅग्रो इंडिया या कंपनीमध्ये कसलेही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. तरी मी कोणत्याही चौकशीसाठी सामोरे जायला तयार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी कसलीही काळजी करावयाची काहीही गरज नाही. लवकरात लवकर कंपनीचे कामकाज पूर्ववत होईल. तरी मी वर दिलेल्या व्हिडीओनुसार आपण त्या त्या कंपनीशी शक्य असेल त्या पद्धतीने एकरूप व्हावे, असा व्हिडीओ व्हायरल केला आहे.