नागपूर : जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड मध्ये अज्ञात रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झाला असून आधीच कोरोना मुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी आणखी हवालदिल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून फळ गळती वाढली असून काही बगिच्यांमध्ये तर 75 टक्क्यांपर्यंत फळगळती झाल्याने आणि उर्वरित फळांना डाग आल्याने शेतकरी निराश झाले आहे.


संपूर्ण देशामध्ये नागपूर जिल्हा संत्रा व मोसंबी या पिकासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यामध्ये दोन्ही पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नरखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी तर याच दोन पिकावर अवलंबित आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोसंबीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कोरोनामुळे बाजार पेठ अनेक दिवस बंद असल्याने आधीच नुकसान सहन करत असलेले शेतकरी आता नव्या अज्ञात रोगामुळे त्रस्त झाले आहे.गेल्या सहा सात दिवसात रोज मोठ्या प्रमाणावर फळ गळती होत असून अनेक बागा फळ विहरीत झाल्या आहेत.


नरखेड तालुक्यात आधीच मृग बहार बहराला नसल्याने शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा आंबिया बहारावर अवलंबित होत्या. तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, जामगाव, मायवाडी, रानवाडी यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात मोसंबीचे आंबिया बहाराचे पीक आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आलेल्या मोसंबीला गळती लागली आणि शेकडो टन मोसंबी गळल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ही फळ गळती कोणत्या रोगामुळे होत आहे, ती का होत आहे याबद्दल शेतकऱ्यांना कोणतीच माहिती नाही. दुर्दैव म्हणजे अद्याप पर्यंत कृषी विभागाने ही त्याकडे लक्ष घातलेले नाही. या रोगाची आणि त्याच्या परिणामांची माहिती कृषी विभागाला सांगितल्या नंतर कृषी विभागाने या भागातील बागांची पाहणी करून आर्थिक मदतीसाठीचा अहवाल शासनाकडे पाठवू असे म्हंटले आहे. मात्र, अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरु केलेलं नाही.


यावेळेला कोरोनामुळे आधीच सुस्त असलेल्या बाजारपेठेत 15 ते 18 हजार रुपये प्रतिटन भाव होते. मात्र, झाडावर फळांचे प्रमाण जास्त असल्याने एकूण उत्पन्न जास्त मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लगेच बागा व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी काही दिवस वाट पाहण्याचे ठरवत बागा विकल्या नव्हत्या. आता अज्ञात रोगामुळे काही दिवसातच अनेक टन मोसंबी खाली पडली आणि शेतकऱ्यांच्या हाती दमडी ही आली नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे.


काही स्थानिक भाजप नेत्यांनी या भागात कृषी विभागाने लवकर पाहणी करून शेतकऱ्यांना उरलेले पीक वाचवण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच शासनाने झालेल्या नुकसानीबद्दल नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.