अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (05 ऑगस्ट) सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊत या शेतकऱ्याचा समावेश आहे. हे तेच मुरलीधर राऊत आहेत ज्यांनी नोटबंदीच्या काळात आपल्या हॉटेलमध्ये महामार्गावरुन जाणाऱ्या आणि नोटबंदीमूळे पैसे नसणाऱ्या प्रवाशांना महिनाभर मोफत जेवण दिलं होतं.


मुरलीधर राऊत यांचं बाळापूर-अकोला मार्गावरील पारस फाट्याजवळ 'मराठा' नावानं हॉटेल होतं. त्यांचं हे हॉटेल आणि शेत सुरत-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या भूसंपादनात गेलं. नोटबंदीच्या काळात त्यांनी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्या दोन महिन्यात पैशांचा आग्रह न करता मोफत जेऊ घातलं.

16 नोव्हेंबर 2016 च्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राऊत यांच्या सेवेचा गौरव केला होता. तब्बल दोन मिनिटांपेक्षा जास्तवेळ ते राऊत यांच्या सेवाभावावर बोलले होते. आपलं हॉटेल अन शेत महामार्गात गेल्याने वाढीव मोबदल्यासाठी मुरलीधर यांचा इतर शेतकऱ्यांसोबत संघर्ष सुरु आहे. शेवटी न्याय मिळत नसल्याने त्यांनी काल इतर सहा शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रक्रूती सध्या स्थिर आहे.

अकोल्याच्या दिलदार हॉटेलवाल्याचं पंतप्रधानांकडून कौतुक