नांदेड : अर्धापूर तालुक्यातील केळी उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत असून जणू संकटाची मालिकाच सुरू आहे. अगोदरच अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच आता नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीवरही करपा रोग आल्यामुळे केळीचा भाव मातीमोल झाला आहे. त्यामुळे केळीचे समोर दिसत असलेले लाखोंचे नुकसान सहन होत नसल्याने देळूब ( बु.) येथील एक तरूण शेतकऱ्याने शेतातील दीड हजार केळीची उभी झाडे कापून टाकत आपला संताप व्यक्त केला आहे.
केळी लागवडीचा खर्चही निघेना...!
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात विविध पिके संकटात सापडली आहेत. अशाही परिस्थितीत आलेल्या संकटाना तोंड शेतकरी जीवन जगत असताना आता तर अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतातील उभ्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके संकटात सापडली आहेत. सध्या केळी पिकाला करपा रोगाने ग्रासले आहे. त्यातच पडलेले भाव यामुळे केळी पिकाचा लागवडी खर्च सुध्दा निघणे दुरापास्त झाले आहे. परिणामी केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
दीड हजार केळी कोयत्याने कापून केली भुईसपाट...!
अर्धापूर तालुक्यातील सर्वच भागात काढणीस आलेल्या केळीच्या संपूर्ण बागाच्या बागा शेतात पिकून उध्वस्त होत आहेत. तर उर्वरित केळीला कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे संतप्त झालेल्या अर्धापूर तालुक्यातील देळुब (बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावरील केळीचे पीक कोयत्याने तोडून भुईसपाट केले आहे. या प्रकारामुळे हतबल झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मात्र शासन या शेतकऱ्यांना मदत देईल काय ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी-शैलेष लोमटे
माझ्या शेतातील दीड हजार केळीची जोपासना करण्यासाठी मला आतापर्यंत एक लाख रुपयांचा लागवड खर्च झाला. असून तीन लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु अचानक केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीस आलेली केळी मोठ्या प्रमाणात झाडालाच पिकत आहे. तर कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे केळीचा लागवडीचा खर्च ही निघत नाही. त्यामुळे एक एकर शेतातील दीड हजार केळीची झाडे कापून टाकली आहे. या प्रकाराला शासनाने गांभीर्याने घेऊन केळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. अशी मागणी शेतकरी शैलेश लोमटे यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही काय ? - हनुमंत राजेगोरे
नांदेड, अर्धापूर, मुदखेड व भोकर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. पण सद्यस्थितीत केळी उत्पादक शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. विशेष म्हणजे ही सर्व तालुके पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात येतात. त्यामुळे येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी केळी पिकाच्या अडचणी संदर्भात पालकमंत्री यांना भेटीसाठी वेळ मागत आहेत. परंतु चार महिन्यात शेतकऱ्यांची अडचण ऐकून घेण्यासाठी पालकमंत्री आपला वेळ देऊ शकले नाहीत. पालकमंत्र्यांकडे गुत्तेदारांसोबत बैठक घ्यायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष कराल येणाऱ्या काळातही हाच शेतकरी शांत बसणार नाही हे लक्षात असू द्या, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी दिला आहे.