मुंबई : आनंदवनात 1999 साली कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया केली. समाजसेवा काय असते हे मला आनंदवनात कळाले. आदिवासी भागात जाण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून मला समाजसेवेचं बाळकडू मला मिळाल्याचं प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ तात्याराव यांनी सांगितले. आतापर्यंत 1 लाख 63 हजार मोतीबिंदूच्या आणि इतर 35 हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. जगात इतकी शस्त्रक्रिया कोणी केल्या नाही आणि शस्त्रक्रिया शक्य देखील नाही. गरीबांना दिसलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतोय. या व्यवसायात मला कायम प्रेरणा मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले.  डॉ. तात्याराव लहाने माझा कट्ट्यावर बोलत होते.


लहाने म्हणाले,  प्रतिकुल परिस्थितीत माझं शिक्षण झाला. मी शाळेत हुशार विद्यार्थी होतो. आम्हाला फक्त अडीच एकर शेती होती. सात भावंडे होतो. 1973 च्या दुष्काळात मी तलाव खोदण्याचं काम करायचो. तलाव खोदल्यानंतर मला सुकडी मिळत असे. परंतु ती सुकडी सर्वांना पुरत नसे. त्या भाजीत माझी आई चटणी आणि मीठ टाकायची. ते मीठ माझ्यासाठी अमृत आणि तिखट इन्सपीरेशन होतं. दोन बहिणी आणि एक भाऊ शिकवला.

'प्रत्येक निवडणुकीत मी उमेदवार असतो. राजकारणात व्यक्ती का जाते ? कारण त्यांना समाजसेवा करायची असते. मला आदर, सन्मान या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहे. मी माझ्या मृत्यूपर्यंत माझा आणि रूग्णांचा डिसकनेक्ट होऊ देणार नाही. मी डॉक्टर आहे, डॉक्टरचं राहणार'. राजकरणात जाणार नसल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.

माझा वाढदिवस कुठेही लिहलेला नाही. माझ्या आईने मला 25 वर्षापूर्वी जी किडनी दिली त्याची शस्त्रक्रिया ज्या दिवशी झाली. तो दिवस मी माझा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. आईने दिलेल्या किडनीचा दिवस हा मी वाढदिवस म्हणून गेली 25 वर्षे साजरा करत असल्याचे लहाने यांनी सांगितले.

लहाने म्हणाले,  काळे नावाचे गृहस्थ भेटले. कमवा आणि शिकवा योजनेत महिन्याला 30 रूपये द्यायचे 50 घागरी पाणी आणायचो. त्यामुळे मला शिकण्यात अडचणी आल्या नाही. माझ्या आईने माझे प्राण वाचविण्यासाठी स्वत: ची किडनी दिली. तेव्हा तीने तिच्या जीवाचा देखील विचार केला नाही. 'माझ्या मुलाला किडनी द्या मृत्यू आला तरी चालेल फक्त मुलगा जगला पाहिजे', हे वाक्य कायम माझ्या लक्षात राहिलं. त्या दिवसापासून मी तुमचा मुलगा चांगला काम करतो हे तिच्यापर्यंत पोहचले आणि हीच माझ्या कामाची पावती आहे.

डॉक्टरीचे शिक्षण घेताना पाच वर्षात मी पुस्तके विकत घेतली नाही. माझ्यासाठी पुस्तके म्हणजे लायब्ररी होती. पाच वर्षात फक्त एकच 52 रूपयांचा पुस्तक विकत घेतले. एमबीबीएसनंतर लहान मुलांचा डॉक्टर बनावे असे वाटत होते. डोळ्यांचा डॉक्टर होण्याचा कोणताही विचार नव्हता. फक्त 700 रूपये मिळतात म्हणून डोळ्याचा डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला, असे लहाने म्हणाले.