धुळे : यंदा होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमानी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त जादा बसेसची सोय केली आहे. 17 मार्च ते 24 मार्च या कालावधीत ही जादा वाहतूक मुंबई आणि कोकणातील विविध बसस्थानकातून करण्यात येणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या काळात संपत असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा होळीच्या सणाला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट गृहीत धरुन एसटी महामंडळाने जादा बसगाड्यांचं नियोजन केलं आहे.
20 मार्चला होळीचा सण आहे. कोकणवासियांना गणेशोत्सवाप्रमाणेच होळीच्या सणाची प्रचंड उत्सुकता असते. मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे थेट दारापर्यंत नेण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे.
17 मार्चपासून मुंबई सेंट्रल, परळ आणि नेहरुनगर, कुर्ला या बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 100 टक्के ग्रुप बुकिंगच्या बसेस, प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्या इच्छित स्थळापासून देण्यात येत आहेत. आरक्षणाच्या बसेस या नियोजित बसस्थानकातून सुटतील.
या सर्व बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. public.msrtcorg.com या संकेतस्थळावरुन तसेच MSRTC MOBILE RESERVATION अॅपद्वारे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करता येणार असल्याचं एसटी प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.