नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदा पद्म पुरस्कारांसाठी 112 जणांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 56 जणांना आज पद्म पुरस्कार देण्यात आले. आज नाट्यकर्मी वामन केंद्रे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.


वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. रवींद्र कोल्हे आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता कोल्हे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हे दांपत्य हे अमरावती जिल्हयातील मेळघाट या आदिवासी भागात लोकांसाठी 1985 पासून सामाजिक कार्य करत आहेत. तिथल्या आदिवासींना वैध्यकीय सेवा देत आहेत.

दरम्यान निवड करण्यात आलेल्या 112 जणांना आज पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरीत 56 सन्मानितांना 16 मार्च रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. आज नृत्य दिग्दर्शक प्रभुदेवा, गायक शंकर महादेवन, मल्याळम अभिनेता मोहनलाल, माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले.

क्रीडा क्षेत्रातील 9 जणांना आज पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गौतम गंभीर (क्रिकेट) ,बजरंग पुनिया(कुस्ती),बोम्बायला देवी (तिरंदाजी) ,सुनील छेत्री (फुटबॉल) ,बचेंद्री पाल (गिर्यारोहण) ,प्रशांती सिंह (बास्केटबॉल),अजय ठाकूर (कबड्डी), शरथ कमाल (टेबल टेनिस) ,हरिका द्रोणावल्ली (बुद्धीबळ)यांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आली.