जालना : "अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती. नंतर फक्त नाटक सुरु होते," असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. आज (शनिवारी) जालना येथे रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दानवे बोलत होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यानंतर दानवे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थापन केलेल्या नव्या मंत्रीमंडळात ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवला आहे. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते आणि जालन्यातील प्रतिष्ठीत लोकांनी दानवे यांचा गौरव केला.

पाहा काय म्हणाले दानवे 



खरंतर शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील विस्तव जात नव्हता. अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालनाच्या जागेवर दावा केला होता. दानवेंना जालन्यात अस्मान दाखवू असा निश्चय खोतकरांनी केला होता. पंरतु युतीनंतर ही जागा भाजपला मिळाली. तरीही खोतकरांनी दानवेंविरोधात लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता. मात्र युतीनंतर त्यांची दिलजमाई झाली होती.

दानवे माझी मेहबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकर | जालना | एबीपी माझा



दरम्यान एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात दानवे काही दिवसांपूर्वी सहभागी झाले होते. यावेळी दानवे यांना खोतकरांसोबतच्या भांडणाबाबत विचारले असता दानवे म्हणाले होते की, "मी आणि अर्जुन खोतकर आम्ही दोघांनी गेली 30 वर्षे जालन्याची जिल्हा परिषद सांभाळली आहे. सत्तेत नव्हतो तेव्हादेखील त्यावर आमचे नियंत्रण ठेवले. डीसीसी बँक आम्ही दोघांनी ताब्यात ठेवली. काही काळ मी डीसीसी बँकेचा चेअरमन होतो तर काही काळ खोतकर चेअरमन होते."

ब्रेकअपनंतर दानवे आणि खोतकरांचं राजकीय 'लफडं' | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



दानवे म्हणाले की, "मी आणि अर्जुन खोतकर दोघे असताना जालन्याची सत्ता हस्तगत करण्याची कोणाचीही हिंमत नाही. भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा या पंचायत समित्या आम्ही दोघांनी ताब्यात ठेवल्या."