भारतात दाखल होण्याचे सर्व निकष मान्सूनने पूर्ण केले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. 5 जूनपासून केरळ, कर्नाटकचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती. परंतु त्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. काही वेळापूर्वी भारतीय हवामान विभागाने त्याची अधिकृत घोषणा केली आहे.
दरम्यान, पुढील चोवीस तासांत मान्सूनची ईशान्य भारतातील शाखाही सक्रीय होणार आहे. त्यामुळे ईशान्य दिशेकडूनही मान्सून येणार आहे. एकाच वेळी देशवासियांना हवामान विभागाने दोन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत.
पाहा संपूर्ण व्हिडीओ
सुरुवातीला मान्सून 5 दिवस उशिराने म्हणजेच 6 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यात आणखी दोन दिवस उशीर झाला आहे. मान्सून पहिल्यांदा केरळच्या समुद्रकिनारी वर्दी देतो आणि त्यानंतर भारताच्या इतर भागांमध्ये मान्सूनचं आगमन होतं. यानंतर पुढील 45 दिवस देशभरात मान्सूनचा पाऊस कोसळतो.
येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार आहे. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आधीच दुष्काळ त्यात मान्सून लांबणीवर पडल्याने शेती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून भारतात दाखल झाला असला तरी मान्सूनचे वारे ताकदवान नाहीत. त्यामुळे उशिरा आलेल्या मान्सूनची इथून पुढची प्रगतीदेखील संथ गतीने होणार आहे. गोवा, महाराष्ट्राचा किनारी भाग आणि मध्य महाराष्ट्रात 12 ते 13 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात येईपर्यंत मान्सूनची गती संथ राहील. परंतु मान्सूनच्या वाऱ्यांची गती वाढेल आणि उत्तर भारतात मान्सून नेहमी पोहचतो त्याच कालावधीत पोहचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणारी मान्सूनची शाखादेखील येत्या अठ्ठेचाळीस तासात सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.