अमरावती : राज्यात सध्या विविध विषयांवरुन राजकारण तापलं असताना महाविकास आघाडीत देखील मतमतांतरं असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीचे नेते जरी सर्व काही आलबेल असल्याचं सांगत असले तरी या आघाडीचे घटक असलेले लोकप्रतिनिधी उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. आता राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आम्ही महाविकास आघाडीत असूनही आमच्यावर अन्याय होतोय असा गंभीर आरोप केला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांचं अकोल्यात विविध सरकारी कार्यालयांमध्ये वेशांतर करुन स्टिंग ऑपरेशन
सत्तेत सहभागी असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आमदार राजकुमार पटेल यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना मान दिला जात नसल्याची खंतही बोलून दाखवली. मेळघाट मतदार संघातील आमदार राजकुमार पटेल यांची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. नुकतेच चिखलदरा येथे पोलीस विश्रामगृहाचं उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले.
विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम; काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावं चर्चेत
यावेळी स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांना निमंत्रण न दिल्याने ते आता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांच्या विरोधात हक्क भंग दाखल करणार आहेत, असं त्यांनीच सांगितलं. राज्यमंत्री बच्चू कडू, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासोबतही असंच डावलण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक आरोपही आमदार पटेल यांनी केला आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे हे स्पष्ट झालं आहे. या सगळ्या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांनी सांगितले की, चिखलदऱ्यात झालेला कार्यक्रम हा छोटेखानी असल्याने त्याची पत्रिकाही छापली नाही आणि तरीही मी आमदार राजकुमार पटेल यांना या कार्यक्रमासंदर्भात कॉल देखील केला होता, पण त्यांनी उचलला नाही, असं त्यांनी सांगितलं.