मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाहीये. काँग्रेसकडून विधानसभा अध्यपदाच्या शर्यतीत प्रामुख्याने दोन नाव आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे.
मात्र महाविकास आघाडीतील शिवसेनेने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस जाहीर करणाऱ्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पसंती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज होणाऱ्या तीनही पक्षांच्या समन्वय समिती नेत्यांच्या बैठकीत यावर तोडगा निघेल अशी आशा आहे.
विधानसभा अध्यक्षपदी कोण बसेल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेतील. लवकरच विधानसभा अध्यक्षाची घोषणी होईल, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्यापालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले आहे. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. राज्यपालांनी 24 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले आहे.
भाजप शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
त्याआधी 23 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या, यामध्ये विधानसभा अध्यपदाचाही समावेश होते. विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त ठेवता येत नाही. अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर ते तसंच ठेवता येत नाही, असं संविधान सांगतं. मात्र तरीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवणं हे संविधानाच अवमुल्यन करण्यासारखं आहे. महाराष्ट्रात संविधानिक कारभार होत नाही, हे तुम्ही राष्ट्रपतींना कळवा, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली होती.
विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया
माजी विधीमंडळ प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी सांगितलं की, "विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपालांना तारीख ठरवणं बंधनकारक असतं. राज्यपाल निवडणुकीची तारीख देतील त्याच्या आदल्या दिवशी अनुमोदक आणि अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला पाहिजे. शक्यतो सात दिवस आधी सदस्यांना कळवणं महत्त्वाचं असतं, मात्र त्यात बदलही करता येतो. राज्यपालांनी सहा ही तारीख दिली तर पाच तारखेला फॉर्म भरुन प्रक्रिया पार पाडता येईल. विधानसभा अध्यक्षांची निवड नियम 6/3 प्रमाणे गुप्त प्रमाणे घेता येते. सर्व आमदारांना दोन तासांची वेळ मतदानासाठी दिली जाते. दोन पेक्षा जास्त उमेदवार आले तर ज्याला कमी मत आहेत त्यांना वगळून पुन्हा दोघांमध्ये निवडणूक होईल."