ED Action On Anil Parab : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानही सोडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याची चित्रे समोर आली आहेत. अशातच मागील दोन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास आणि बुधवारी जवळपास आठ तास ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 


अनिल परब यांना ईडीने गुरुवारी सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. ईडीने त्यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितलेय.  दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. 






राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा  आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले होते.  काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.  


अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.