मुंबई: शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कोणताही सल्ला दिला नाही, वेळ आल्यावर विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवणार असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार वाचवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला असल्याच्या बातम्या येत होत्या. संजय राऊत यांनी त्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, "आम्हाला सत्तेचा मोह, माया किंवा लोभ नाही. आम्ही लढत राहू. आम्ही लढणारे आहोत, शेवटपर्यंत लढणार. सत्याचाच विजय होईल."
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामिल झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ते आता गुवाहाटीला पोहोचले आहेत.
संजय राऊत यांचे ट्वीट
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आता लढाईच्या तयारीत असून संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. होय, संघर्ष करणार असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होत असल्याचं ट्वीट अवघ्या सहा तासांपूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता संघर्ष करणार असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय आहे?
1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
3. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.