मुंबई : महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे, असा दावा महाविकास आघाडीतील अनेक नेते वारंवार करत आहेत. अशातच अंतर्गत कुरघोडींची एक घटना समोर आली होती. काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर अशासकीय व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. नितीन राऊत यांनी कोणाशीही चर्चा न करता परस्पर हा निर्णय घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढचं नाहीतर त्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांची तक्रार केल्याचं समोर आलं होतं. परंतु, आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.


ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वांना अंधारात ठेवून वीज कंपन्यांवर परस्पर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील 16 सदस्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही सल्ला घेतला नव्हता. यापैकी बहुतांश सदस्य नागपूरचे होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. तर काँग्रेसचेही अनेक नेते नितीन राऊत यांच्यावर नाराज होते. अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्याअशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना तिनही पक्षांनी एकत्र बसून नियुक्त्या केल्या पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं.


पाहा व्हिडीओ : सारथीचा कारभार काँग्रेसकडेच राहिला पाहिजे : बाळासाहेब थोरात



ऊर्जा खात्यातील नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नाराजी नंतर या नियुक्तांचा फेरविचार होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, ' तीन पक्षांचं एकत्रित सरकार आहे, त्यामुळे एकत्रित चर्चा करूनच या नियुक्त्या करण्यात आल्या पाहिजे. त्यामुळे याचा फेरविचार करण्यात येणार आहे. नाराजी हा विषय नाही. जर काही झालं असेल आणि कोणी नाराज असेल, तर आम्ही ती नाराजी दूर करू. त्यामुळे आघाडीत नाराजी हा सूर बरोबर नाही.' तसेच यावेळी बोलताना त्यांनी सारथी काँग्रेसकडे राहिलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे असंही म्हटलं. तसेच मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवण्यात आलं आहे अशी माहितीही दिली.


'निधी वाटप सर्व आमदारांना समान लेखून केलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. हे शिवसेना, राष्ट्रवादीच्याही आमदारांचं म्हणणं आहे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. सरकार चालवताना या गोष्टी होत असतात. चर्चा केली जाते, धोरणं ठरवली जातात. काही समस्या आल्या तर त्यातून मार्ग काढत असतो,' असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. दरम्यान परस्पर केलेल्या नियुक्त्यांवरील वादानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल वाढलं : ऊर्जामंत्री नितीन राऊत


महावितरणमधील तंत्रज्ञानाच्या 7 हजार पदांसाठी उमेदवारांची निवड आठवडाभरात जाहीर करा : ऊर्जामंत्री नितीन राऊत