Nana Patole on Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याने खळबळ उडाली आहे. एसआयटी पथकातील पीएसआय नीलेश मोरे आणि संजय शिंदे हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षात आरोपी शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला. शिंदेला पोलीस कोठडीत घेत असताना गोळीबार केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणावर विरोधी पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 






काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल केला आहे. नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ  केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. 


या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. 


1. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?
2. फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ? 
3. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?  या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.


पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला? 


अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी आपली बंदूक काढून अक्षय शिंदेवर गोळीबार केला.


इतर महत्वाच्या बातम्या