गोंदिया : जिल्ह्यात भारत संचार निगमने ( बीएसएनएल) वीज वितरण कंपनीचे 45 लाख रुपयांचे वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बीएसएनलच्या तब्बल 28 दूर संचार केंद्रांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागात वोडाफोन, एअरटेल, जियोसह आजही मोठ्या प्रमाणात बीएसएनएलचे युजर्स आहेत. जिल्ह्यात बीएसएनएलचे 125 मोबाईल टॉवर आहेत. त्यापैकी जवळपास 70 मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित केल्याने मोबाईल टॉवर बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक बीएसएनल ग्राहकांना फटका बसला आहे.

गोंदियामधील अनेक बँका, शासकीय कार्यालयांमध्ये बीएसएनएलची सेवा सुरु आहे. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे बँका आणि शासकीय कार्यालयांमधील व्यवहार ठप्प आहेत.

आज मानवी जीवनात अन, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे मोबाईलधारकांसाठी इंटरनेट हीदेखील महत्त्वाची गरज आहे. बीएसएनएसची सेवा बंद असल्याने त्यांच्या युजर्सना फटका बसला आहे. परिणामी जितके दिवस टॉवर बंद असतील तितक्या दिवसाची व्हॅलिडिटी (कॉल आणि डेटाची व्हॅलिडिटी) वाढवून द्यावी, अशी मागणी तरुण करत आहे.

एबीपी माझाने यासंदर्भात बीएसएनएलच्या अधिकऱ्यांशी बातचित केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरिष्ठ स्थरावरुन अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही वीजबिल भरू शकलो नाही.