नवी दिल्ली: महाराष्ट्र, तामिळनाडूसह 13 राज्यांना आता वीज खरेदी करता येणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी असलेल्या पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (POSOCO) वीज पुरवठा करणाऱ्या इंडिया एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज या कंपन्यांना 5000 कोटींहून अधिक वीज बिल थकित असलेल्या 13 राज्यांना वीज पुरवठा करु नका असा आदेश दिला आहे.
वीज बिल थकित असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोसोको या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीच्या आदेशामुळे आता या राज्यांना वीज खरेदी करता येणार नाही.
पोसोकेने या तीन वीज कंपन्यांना एक पत्र लिहिलं आहे. या 13 राज्यांतील 27 वितरण कंपन्यांची विक्री ही 19 ऑगस्ट 2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करावी असा आदेश या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या राज्यांकडे 5000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम थकित असल्याने कंपन्यांनी त्यांना करण्यात येणारा वीज पुरवठा बंद करावा म्हटलं आहे. या राज्यांकडून जोपर्यंत थकित वीज भरलं जात नाही तोपर्यंत त्यांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करु नये असंही या पत्रात म्हटलं आहे.
या 13 राज्यांना आताही वीज तुटवड्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे पोसोकोच्या या नव्या आदेशामुळे मात्र या राज्यांमधील वीज संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वीज दरात मोठी वाढ
महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. याचा थेट फटका राज्यातील ग्राहकांना बसणार आहे. कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा FAC वाढवला आहे. जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.
FAC म्हणजे इंधन समायोजन आकारात कशी वाढ झाली?
- 0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे
- 101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे
- 301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे
- 501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे
महत्त्वाच्या बातम्या:
- Electricity Amendment Bill 2022 : केंद्र सरकार आणणार वीज दुरुस्ती विधेयक; स्वस्त किंवा मोफत विजेचा फायदा घेणाऱ्यांना बसणार चाप
- Vidarbha Industries : विदर्भातील उद्योगांना देणार वीज सबसिडी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही