मुंबई  : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या (Electric scooter) स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय. वसईमध्ये (Vasai ) ही दुर्देवी घटना घडली आहे. शब्बीर शाहनवाज अन्सारी असे स्फोटात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्जिंग लावली असताना हा स्फोट झालाय. 23 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. स्फोटात जखमी झालेल्या शब्बीर याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना या चिमुरड्याचा शुक्रवारी रुग्णालयात झाला आहे. 


सध्या वाढते इंधन दर आणि पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनांना नागरिक अधिक पसंती देत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीला लागणाऱ्या आगीमुळे इलेक्ट्रिक वाहन चिंतेचा विषय बनत आहे. या पूर्वी देखील इलेक्ट्रिक वाहनांचे स्फोट झालेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता वसईत इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज करताना झालेल्या स्फोटात शब्बीर या सात वर्षीय चिमुरड्याचा जीव गेला आहे. 


वसई पूर्वेकडील रामदास नगर येथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी 23 सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्याना आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. पहाटे साढे पाचच्या दरम्यान बॅटरीचा भीषण स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले. शब्बीर हा 70 ते 80 टक्के भाजला. तर या बॅटरी स्फोटामुळे शहनावाजच्या घराला आग ही लागली. या आगीत घराचं देखील बरच नुकसान झालं. घरातील सामान जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शब्बीरवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 


माणिकपूर पोलिसांनी बॅटरीच्या ओवर चार्ज किंवा शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. माणिकपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती परिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिलीय. 


दरम्यान, गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पाच कंपन्यांना केंद्र सरकारने नोटीस देखील बजावली होती. 


महत्वाच्या बातम्या


इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आगीच्या घटना, पाच कंपन्यांना केंद्र सरकारने बजावली नोटीस 


Electric Scooter Fire: खराब बॅटरी कूलिंग सिस्टीममुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग, माहिती आली समोर