मुंबई : कामाच्या शोधात गावात भटकंती करणाऱ्या एका तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केलीय.  मुलं पळविण्याच्या संशयातून या तरूणाला मारहाण करण्यात आलीय. मारहाण केल्याची घटना व्हायरल व्हिडीओमुळे समोर आली आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील परिवली गावात घडला आहे. शंकर नागराव गुंडगुडे (वय 28) असं बेदम मारहाण  झालेल्या बेरोजगार तरुणाचं नाव आहे. 


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह ठाणे जिह्यात सोशल मीडियावर मुलं चोरी केली जात असल्याचे व्हिडीओ, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे गावागावात  मुलं पळविण्याऱ्या टोळीची चर्चा सुरु आहे. संशयावरून आतापर्यंत अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना राज्यभरात घडल्या आहेत. असाच प्रकार भिवंडी तालुक्यातील परिवली गावात दोन दिवसापूर्वी घडला आहे. मुलं पळविण्याच्या संशयातून या तरूणाला मारहाण करण्यात आलीय.


शंकर हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिखली गावाचा रहिवाशी आहे. गावाकडे काम नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून कामाच्या शोधात भिवंडी तालुक्यात आला होता. मात्र त्याला बरेच दिवस झाले काम मिळत नसल्याने तो कामाच्या शोधात गावागावात पायपीट करून भटकंती करत असतानाच आज तो पारवली गावात  पोहचला होता. मात्र खिशात पैसे नसल्याने त्याला पोटभर अन्नही मिळत नव्हतं. अशाच अवस्थेत दोन दिवसापूर्वी पारवली गावातील काही तरुणांनी त्याला मुलं पळविणारा असल्याचे समजून बेदम मारहाण करून एका झाडा बांधून ठेवले आणि भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील शेलार चौकीतील पोलिस कर्मचाऱ्याला या घटनेची माहिती दिली.


माहिती मिळताच पोलिस नाईक सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाकडे चौकशी केली. चौकशीत शंकर हा मजुरीच्या शोधात पारवली गावात आल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या नावाची नोंद करून त्याला सोडून देण्यात आले. मात्र, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणांनी पुरेशी खातरजमा न करताच शंकरला बेदम मारहाण केल्याने समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केलीय. शिवाय मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर  कारवाई  करण्याची मागणी करण्यात येत आहे. 


राज्यभरात सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरली असून पालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मुलं चोरणारे लोक समजून अनेकांना नाहक मार खावा लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.  


महत्वाच्या बातम्या


Satara News : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणं प्रियकराला महागात, मुलं चोरणारा व्यक्ती समजून बेदम चोप