लोणावळा : लोणावळ्याजवळच्या कार्लामधील एकविरा देवी मंदिराचे कळस शोधण्यासाठी मंदिर समितीने पोलिसांना पंधरा दिवसाची मुदत दिली आहे. 15 दिवसात कळस शोधण्यात पोलिसांना अपयश आल्यास दुसरा कळस बसविण्यात येईल, असा इशारा ही राज्य सरकारला मंदिर समितीकडून देण्यात आला आहे.


स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांना कळस देण्यासाठी समितीने एकमुखाने संमती दिली आहे. 3 ऑक्टोबरच्या पहाटे अवघ्या चार मिनिटांत चोरटयांनी हा कळस चोरला होता. पोलिस, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही तैनात असताना ही चोरी झाल्याने पोलिस आणि मंदिर समितीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र मंदिर समिती सुरक्षेच्या दृष्टीने कुठेच कमी पडली नसून केवळ पोलिसांची निष्क्रियता चोरीला कारणीभूत ठरल्याचा दावा मंदिर समितीनं केला आहे.

दरम्यान कळसाच्या चोरीनंतर मंदिर समिती सुरक्षेच्या दृष्ठीने नवीन पावलं उचलली आहेत.

- रात्री आठ नंतर पोलिस आणि सुरक्षा रक्षकाविना मंदिर परिसरात कोणाला सोडलं जाणार नाही.

- रात्री मंदिरात प्रवेश बंद केल्यानंतर लेणी विभागाचे गेट ही बंद केले जाणार.

- नियुक्तीपूर्वीच सुरक्षा रक्षकांचे पोलिस व्हेरिफिकेशन घेतले जाणार.
- अंतर्गत सुरक्षेत वाढ करणार.

- सीसीटीव्ही वाढवले जाणार.

- ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पार्किंग जवळ गेट बसवले जाईल.

मंदिर समितीकडून पत्रकारांना पैसेवाटप

दरम्यान लोणावळ्याच्या कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेल्यानंतर आता मंदिर समितीने तर त्याहून मोठा कळस गाठला आहे. आठवड्याभरानंतरही चोरटे सापडत नसल्यानं सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी समितीने पत्रकार परिषद घेतली.

मात्र सरकार आणि पोलिसांसोबतच मंदिर समितीच्या सुरक्षा यंत्रणेवर ही प्रश्न उपस्थित होत आहेत. याची माध्यमांमधून आणखी वाच्यता होऊ नये, म्हणून थेट पत्रकारांना पैसे वाटले जात होते. पत्रकार लांबून आलेत तर जेवण आणि येण्या-जाण्याचा खर्च म्हणून पैसे घ्या असा आग्रह मंदिर समितीचे खजिनदार नवनाथ देशमुख यांनी धरला.

साहेबांनी सांगितले आहे सर्वांना स्वखुशीने पैसे द्या. हे साहेब म्हणजे मंदिर समितीचे अध्यक्ष अनंत तरे आहेत.