Navratri 2022 Dhule Ekvira Devi Live :आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. खान्देशात देखील कुलस्वामिनी (Khandesh Kulswamini Ekvira Devi) महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिरात (Ekvira Devi Mandir) आजपासून नवरात्र उत्सवाला (Navratri Utsav 2022) सुरुवात झाली. नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरात आयोजन करण्यात आले असून पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या श्री एकविरा देवीचे मंदिर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या मंदिरात देवीची विलोभनीय मूर्ती असून महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील अनेक भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या एकविरा देवी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात तसेच मंदिरात चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र असे दोन नवरात्र उत्सव साजरे केले जातात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला एकविरा देवी मंदिरात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली, पहाटे मंदिरात देवीची विधिवत पूजा आणि घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. पुढील नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात करवीर पीठाचे शंकराचार्य हे देखील उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भक्त निवासाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
पार्वतीच्या रूपात बांधण्यात आली पूजा
नवरात्राच्या पहिल्या दिवशी आज देवीचा पांढरा रंग असल्याने देवीला पांढरी साडी नेसवण्यात आली होती. तसेच देवीचा साज शृंगार पार्वतीच्या रूपात करण्यात आला होता. नऊ दिवस मंदिरात कुमारिका पूजन कुंकुमार्चन, शतचंडी यज्ञ असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली.
भक्तनिवासाचे होणार लोकार्पण
एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचे करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात राज्यातून येणाऱ्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी हे भक्तनिवास उभारण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेराची असेल नजर
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त 24 तास मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त देखील असणार आहे.
कोरोनाच्या 2 वर्षानंतर होणार उत्सव
दरम्यान, गेल्या दोनवर्षांपासून कोरोना संकटामुळे राज्यभरात विविध सण साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता कोरोनाच्या 2 वर्षानंतर नवरात्र उत्सव होत असून यामुळे भाविकांची गर्दी होणार असल्याने मंदिर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. यामुळेच यंदाचा नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या