मुंबई : ज्यांनी कार्यकर्त्यांना घरगडी समजलं त्यांना जनतेनं उत्तर दिलं. आता राजन साळवींनीही त्यांना सोडलं. 'ज्यांच्या विचारांना लागली वाळवी, तिकडे कसे राहतील राजन साळवी' असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मी मुख्यमंत्री असताना राजन साळवी याने माझ्यासोबत यावं असं वाटत होतं. त्यावेळी ती वेळ आली नव्हती. पण आता राजन साळवी आपल्यासोबत आले आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 


एकनाथ शिंदे म्हणाले की, "  राजन साळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो. त्यांनी तीन वेळा आमदार होते. स्वतः किरण सामंत यांना आमदार होण्याची संधी असतानाही त्यांनी राजन साळवींना पक्षात घ्यावं आणि उमेदवारी द्यावी असं सांगितलं होतं. पण काही गोष्टी वेळेनुसार होतात. आमच्या पक्षात मालक आणि नोकर असा भेदभाव नाही. इथे मी देखील कार्यकर्ता आहे. जो काम करेल तोच राजा बनेल."


कोकण भगवामय झाला पाहिजे. कारण बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं, कोकणवासियांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


कार्यकर्त्यांना घरगडी समजायचे


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्हीदेखील बाळासाहेबांच्यासोबत काम केलं. ते सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. पण त्यांच्या पश्चात सगळ्यांना घरगडी समजले जायचे. त्यामुळे आपल्याला अडीच वर्षांपूर्वी बंड करावा लागला. गेल्या अडीच वर्षे लोकांची कामं केली. इतिहासामध्ये नोंद होतील अशी कामं केली. त्यामुळेच अनेक लोक शिवसेनेत येतात."


जर पक्ष मोठा होणार असेल तर राजन साळवींना पक्षात घ्यावं असं उदय सामंत आणि किरण सामंत यांनी सांगितलं. हा सर्वसामान्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्याऱ्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


शिंदे जिथे उभा तिथून लाईन सुरू


एकनाथ शिंदे म्हणाले की, "दिल्लीत मराठी माणसांच्या नावाने मराठी माणसाला पुरस्कार मिळाला. पण त्यांना किती जळफळाट झाला. माझी लाईन कमी करण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना.  हा एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणाहून लाईन सुरू होते. ती लाईन ही जनसेवेची असते."


आम्हाला आजपर्यंत त्यांनी ज्या पदव्या दिल्या त्याच पदव्या आता राजन साळवींनाही देतील असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला. 


 



ही बातमी वाचा: